धक्कादायक... रेल्वेत सोडलेली 15 दिवसांची चिमुरडी 11 दिवसांनी मिळाली; बापच निघाला आरोपी
मुलीची काळजी घेण्यास स्वतःला असमर्थ वाटत असल्याने बापानेच मुलीला जबलपूर-अमरावती एक्स्प्रेसमध्ये सोडून दिले. मुलगी गायब झाल्याची बतावणी करुन पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
Nagpur News : जबलपूर-अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात 15 महिन्यांच्या मुलीला वडिलांनी सोडून दिल्यानंतर जीआरपीने (GRP) अकरा दिवसांनी आरोपीला शोधून काढण्यात यश मिळवले. कृष्णकुमार राजकुमार कौशल असे आरोपीचे नाव असून तो तांदुल, पोस्ट पलौड, जिल्हा रायपूर (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे. कृष्णकुमार हा पत्नी ललिता आणि 15 महिन्यांच्या मुलीसह चेन्नई येथे राहत होते. ललिता दुसऱ्यांदा गरोदर राहिल्याने कृष्णकुमार तिला गावी घेऊन जाण्यासाठी चेन्नई येथून निघाला. रात्री दोनच्या सुमारास त्यांनी नागपूर गाठले आणि स्टेशनवरच रात्र काढली.
मुलगी गायब झाल्याची बतावणी
कृष्णकुमारला आपल्या मुलीला सांभाळण्यास असमर्थ असल्याचं वाटल्यानं त्यानं हे पाऊल उचलले. पत्नी गाढ झोपेत असताना मुलीला प्लॅटफॉर्म 2 वर उभ्या असलेल्या 12160 जबलपूर-अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात सोडून दिले. सकाळी उठल्यावर मुलगी गायब झाल्याची बतावणी करुन शांतीनगर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. नागपुरात लहान मुलांच्या तस्करीचे वातावरण तापले असतानाच 5 महिन्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांसाठी पुन्हा धक्कादायक होती. तपासादरम्यान, रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये, कृष्णकुमार आपल्या मुलीस ट्रेनमध्ये घेऊन जाताना दिसून आला, मात्र परतीच्या मार्गावर तो एकटाच दिसून आला. संशयास्पद हालचाली लक्षात घेवून पोलिसांनी आपल्या पद्धतीने त्यास बोलते केले. तेव्हा कृष्णकुमारने आपला गुन्हा मान्य केला.
सिंदी रेल्वेत मुलगी मिळाली
जीआरपी आणि स्थानिक पोलिसांनी (Nagpur Police) छोट्या मुलीला सुखरूप शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली. तेव्हा सिंदी रेल्वे येथील गीता अंभोरे या महिलेकडे ही मुलगी मिळाली. जीआरपीच्या पथकाने (GRP Team) मुलीसोबत गीता अंभोरे हिला स्थानिक पोलिस ठाण्यात हजर केले. तेथून लहान मुलीस नागपूरच्या श्रद्धानंद अनाथाश्रमात आणले. ही कारवाई जीआरपीच्या पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय अधिकारी हेमंत शिंदे, पीआय काशीद, एपीआय भलावी, पटले, मिश्रा, उके, मोगरे, अली, खवसे, घुरडे, महिला कॉन्स्टेबल पठाण आदींनी केली.
...म्हणून पोलीस अलर्ट मोडवर
शहरात गेल्या काही आठवड्या चिमुकल्यांची चोरी करुन त्यांची विक्री करणाऱ्या अनेक प्रकरणांचा तपास पोलिसांनी लावला आहे. एका आठ महिन्यांच्या बाळाच्या विक्रीचा तपास करत असताना पोलिसांनी सुमारे सहा ते सात प्रकरणे उकलून काढली आहेत. लहान मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांचा तपास करण्यासाठी शहरातील पोलीसांनी कंबर कसली आहे. अशा प्रकरणांमध्ये विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
ही बातमी देखील वाचा