Ramdas Athawale: "...तर 'मविआ'ची सत्ता स्थापन झाली नसती," भाजप-ठाकरेंच्या सत्तेचा फॉर्म्युला फिस्कटण्यामागचं कारण आठवलेंनी सांगितलं
Ramdas Athawale: उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत फॉर्म्युला स्वीकारला असता तर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सत्ता आली नसती, असं वक्तव्य आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
नागपूर: मागील 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या 105 जागा निवडून आल्या. तर शिवसेनेच्या 56 जागा निवडणून आल्या. 56 जागांच्या बळावर सेनेने भाजपकडे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद मागितले. पण, त्यासाठी भाजप तयार झाला नाही; पण शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्नही भाजपने केला नाही. भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करेल आणि त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेशिवाय पर्याय नसेल, असा शिवसेनेचा कयास होता. मात्र, तो पूर्णपणे फोल ठरला. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मदतीचा हात देत उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पद देत राज्यात सत्ता स्थापन केली, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत 3-2चा फॉर्म्युला स्वीकारला असता तर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सत्ता आली नसती, असं वक्तव्य आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं आहे.
काय म्हणालेत रामदास आठवले?
उद्धव ठाकरे भाजपसोबत युतीमध्ये असताना त्यांच्या जागा निवडून आल्या होत्या. मात्र त्यावेळी 3-2चा फॉर्म्युला स्वीकारावा असं मी म्हटलं होतं. मात्र त्यावेळी दोघांनी सुद्धा तो फॉर्म्युला स्वीकारला नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याला पसंती दिली, असं आठवलेंनी (Ramdas Athawale) म्हटलं आहे.
2019 मध्ये एकत्रित निवडणूक लढलो. अमित शहा मातोश्री वर गेले होते. ते उद्धव ठाकरे यांना भेटले. तेव्हा लोकसभा व विधानसभा एकत्रित लढायच्या हे ठरल्याची माहिती होतं. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की अमित शाह यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाला मान्यता दिली होती. तर अमित शाह अनेक वेळेला बोलले आहेत, की ते असे बोललेच नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये काय झालं होतं, हे फक्त दोघांनाच माहिती आहे. निवडणूक निकाल आल्यानंतर भाजपच्या 105 जागा आल्या, 12 - 13 अपक्षांचा पाठिंबा भाजपला होता. उद्धव ठाकरे यांना 56 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सर्व सोबत आल्याशिवाय सरकार बनवणे शक्य नव्हतं.
तेव्हा मी संजय राऊत यांच्याशी दिल्लीत बोललो होतो. तेव्हा मी तीन वर्ष आणि दोन वर्ष मुख्यमंत्रीपदाचा पदाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा संजय राऊत यांनी मला भाजपशी बोलण्यास सांगितले होते. तेव्हा भाजप श्रेष्ठी आणि देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्ष आणि दोन वर्षाचा फॉर्मुला स्वीकारला असता, तर फडणवीस तीन वर्ष मुख्यमंत्री झाले असते आणि दोन वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता गेली नसती. मात्र, तेव्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही काही निर्णय घेतला नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनीही काहीच केले नाही, असंही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं आहे.