(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parashuram Ghat : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट महिन्यानंतर वाहतुकीसाठी खुला
गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परशुराम घाटाचा काही भाग खचला आणि घाट काही दिवस बंद ठेवावा लागला. पर्यायी मार्गाने काही वाहतूक वळवण्यात आली,पण अवजड वाहने दोन आठवडे बंद ठेवण्यात आली.
Mumbai Goa High Way Parshuram Ghat : गेले काही वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. या अर्धवट आणि धिम्या गतीने सुरु असलेल्या कामाचा फटका महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना चांगलाच बसतोय. त्यात गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परशुराम घाटाचा काही भाग खचला आणि घाट काही दिवस बंद ठेवावा लागला. पर्यायी मार्गाने थोडी थोडी वाहतूक वळवण्यात आली पण अवजड वाहने दोन आठवडे बंद ठेवण्यात आली.
नंतर तात्पुरत्या स्वरुपाच्या उपाययोजना करुन पुन्हा परशुराम घाट वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला. पण घाट खचतच चालल्याने पुन्हां घाटातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करतांना परशुराम घाटातून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी घाटातील कटाई आणि रुंदीकरण आणि सुरक्षा वॉलचे काम लवकर पूर्ण व्हावे याकरिता महिनाभर हा घाट दिवसातून पाच तास दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कामाकरीता 25 एप्रिल ते 25 मे पर्यंत घाट वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला.
या कालावधीत अवघे 65 टक्के काम कंत्राटदार आणि कंपन्याकडुन करण्यात आले. तर 700 मीटरचे कॉक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. गुरुवारपासून हा घाट वाहतूकीसाठी 24 तास खुला करण्यात आला आहे.घाटाच्या कामाकरता ज्या पोलिस चौक्या आणि बंदोबस्त लावण्यात आला होता तोही हटवण्यात आला आहे.घाट बंद च्या काळात रेल्वेतून कोकणात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. रेल्वेलाही गर्दी वाढलेली आपल्याला पाहायला मिळत होती. आता हा घाट सुरु झाल्यामुळे रेल्वेतून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची गर्दीही काही प्रमाणात कमी होईल.
हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरीही घाटातील रुंदीकरणाची किरकोळ कामे सुरुच राहणार आहेत. त्यात पावसाळ्या पुर्वी ही कामे सुरु राहणार आहेत. तर उंचीवरील डोंगर कटाईची कामे बंद राहणार आहेत.
पावसाळ्यात या घाटातून प्रवास करतांना काळजीपूर्वक प्रवास करावा लागणार आहे. हा घाट रुंदीकरणात ठिकठिकाणी कापण्यात आला आहे. शिवाय या घाटातील माती भुसभुशीत असल्याने सरकर खाली सरकते. या मातीत अजिबात चिकटपणा नसल्याने घाटात काही ठिकाणी माती खाली सरकण्याची चिन्ह नाकारता येत नाही.
सुरक्षा भिंत आणि ओढलेला मातीचा ढिगारा यातील अंतर कमी आणि यातुनच प्रवास ही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटातून प्रवास करतांना सावधगिरीने प्रवास करावा लागणार आहे.