ST Bus News : एसटी महामंडळाचा पाय आणखी खोलात? राज्य सरकारकडून सवलतीची 600 कोटींची रक्कम थकीत असल्याचा आरोप
ST Bus News : विविध सवलतीचे प्रवासी भाड्याची थकीत रक्कम राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला मिळाली नसल्याचा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.
ST Bus News : राज्याची लाइफलाइन समजली जाणारी 'लालपरी' एसटीचा (MSRTC) आणखी पाय आणखी खोलात जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विविध सवलतीचे राज्य सरकारकडून येणारा निधी महामंडळाला मिळाला नसल्याचा दावा एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. सदरची रक्कम देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत असून एसटी सक्षम करण्याच्या पोकळ घोषणा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एसटी बसमध्ये विविध समाज घटकातील नागरिकांना प्रवाशी भाड्यात सवलत दिली जात आहे. त्या मध्ये मुख्यत्वे करून स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्यासोबतचा सहप्रवासी, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, पाचवी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी, अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांच्यासोबत प्रवास करणारा सहकारी, डायलेसिस रुग्ण अशा काहींना संपूर्ण मोफत प्रवास तर काहीना 50 टक्के सवलत प्रवाशी भाड्यात दिली जात आहे.
एसटी बसमध्ये एकूण 29 प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्याची प्रतीपूर्तीची रक्कम सरकार वर्षानुवर्षे करीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही रक्कम थकली असून सन 2021 आणि सन 2022 मधील एकूण 389 कोटी येणे बाकी आहे. तर, आतापर्यंतची एकूण अंदाजे 600 कोटी रुपयांची रक्कम सरकारकडे थकीत आहे. सदरची रक्कम देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत असून एसटी सक्षम करण्याच्या पोकळ घोषणा करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी बसमधून समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामध्ये 29 प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत. सवलतीच्या संपूर्ण रक्कमेची प्रतिपूर्ती सरकार करीत असून साधारण वर्षाला 1600 कोटी रुपये इतकी रक्कम सरकार महामंडळाला अनेक वर्षे देत आहे. पण सरकारने गेले काही महिने सरकारने यातील एकही पैसा दिला नसून एसटी सक्षम करण्याच्या निव्वळ गप्पा मारल्या जात आहेत.असेही बरगे यांनी म्हटले आहे.
एसटी उत्पन्नात घट
काही दिवसांपूर्वी एसटीची प्रवासी संख्या 25 लाखांहून 50 लाखांवर पोहचली होती. त्याच्या परिणामी एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली होती. एसटीचे उत्पन्न 14 कोटींहून 23 कोटींच्या घरात पोहचले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांत पुन्हा एकदा एसटीचे उत्पन्न हे 14 कोटींच्या घरात पोहचले. त्यामुळे एसटीच्या आर्थिक स्थितीबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.