Sinner Success Story : मेकॅनिकल इंजिनिअर झाला, मात्र मन रमत नव्हतं, शेवटी मेहनत घेतली अन् सिन्नरचा तरुण फौजदार झाला!
Sinner Success Story : ग्रामीण भागात राहून कोणताही क्लास किंवा कोणतीही ऍकेडमी न लावता, सिन्नरच्या (Sinner) वैभवने स्वप्न सत्यात उतरवलंय.
Sinner Success Story : आजही स्पर्धा परीक्षा म्हटलं की लाखोने तरुण तरुणी आपल्या ध्येयाच्या दृष्टीने अभ्यास करत असतात. पोलीस सेवेत भरती होणं हे अनेक मुलांमुलींचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक मुलं पुणे तसेच पुण्या मुंबईची वाट धरतात. मात्र, ग्रामीण भागात राहून कोणताही क्लास किंवा कोणतीही कोचिंग क्लास न लावता, सिन्नरच्या (Sinner) वैभवने हे स्वप्न सत्यात उतरवलंय. तेही फक्त घरीच अभ्यास करून. वैभव बाळासाहेब गुंजाळ (Vaibhav Gunjal) याने गावातील पहिला फौजदार होण्याचा मन मिळवला आहे.
नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय (MPSC PSI) पदाचा निकाल लागला. राज्यभरातून हजारो तरुण तरुणी पीएसआयपदी वर्णी लागली. नाशिक (Nashik) जिल्ह्यातूनही अनेक तरुणांनी स्वतःच्या हिमतीवर, रात्रीचा दिवस करून मेहनत घेत पोलीस सेवेत दाखल होण्याचा टप्पा पार केला आहे. सिन्नरच्या सुळेवाडी येथील वैभव गुंजाळने देखील पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. मॅकेनिकल्स इंजिनिअर होऊनही ते क्षेत्र सोडून आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वैभव फौजदार झाला आहे. सुळेवाडी या छोट्या गावातुन वैभवने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परिक्षेत यश मिळून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. विशेष म्हणजे गावातुन पहिला फौजदार होण्याचा मानही वैभवने मिळवला असून या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुळेवाडीचे स्व.बाळासाहेब किसन गुंजाळ यांचा थोरला मुलगा वैभव आहे. गुंजाळ परिवाराला सुळेवाडीच्या डोंगराळ भागात जेमतेम शेती आहे. शेतकरी कुटुंबातील कष्टकरी गुंजाळ परिवार आहे. 2019 ला वडीलांचे आकस्मित निधन झाल्यांनतर या कुटुंबातील सर्व जबाबदारी आई मनिषा गुंजाळ यांनी उचलली. थोरला मुलगा बारागांव पिंप्रीला दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळाले. कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमुळे लवकरात लवकर नोकरी मिळावी या उद्देशानेइंजिनिअरिंग करण्याचे ठरविले. त्यानुसार संगमनेर येथील महाविद्यालयांत मॅकेनिकल्स इंजिनिअर क्षेत्र निवडले. त्यात यशस्वी होत, चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. मात्र पोलीस सेवेत जाण्याचे ध्येय स्वस्थ बसू देत नव्हते. दहावीपासूनच पोलीस वर्दीचे आकर्षण असल्याने ते डोक्यातून जात नव्हते.
त्यामुळे मॅकेनिकल इंजिनिअर होऊनही पुन्हा स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अभ्यासाला सुरवात केली. मात्र त्याच काळात जगभरात कोरोनाचे संकट आ वासून उभे राहिले. त्यामुळे अभ्यास चालू होता, मात्र एकही परीक्षा होत नव्हती, सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येत होत्या. कोरोनाचे मळभ दूर झाल्यानंतर मात्र लागलीच परीक्षा देण्यास सुरवात केली. तोपर्यंत कोणताही क्लास किंवा ऍकेडमी न लावता आजूबाजूच्या मित्रांना सोबत घेऊन अभ्यास सुरूच होता. सुरवातीला पीएसआय पदाची परीक्षा दिली. त्यानंतर पहिल्याच पर्यटनात प्रिलिम आणि मेन्स देखील पास झालो. शेवटी मुलाखतीची तयारी देखील चांगली झाल्याने पीएसआय पदावर निवड झाली.
स्वप्नातही वाटलं नव्हतं...
वैभवने घरी राहून शेती व्यवसाय सांभाळून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. आई मनिषाने लहान मुलगा भुषण पुण्यात युपीएससीची तयारी करण्यासाठी पुण्याला पाठविले आहे. गुंजाळ भावंडांची बहिण उषा इंजिनिअर पुण्यात नोकरी करते. तीन मुलांना आई मनिषा गुंजाळ ने मोलमजुरी करून शिकवले. मुलांनी स्वबळावर कॅरिअरच्या वाटा शोधल्या आहे.आज वैभवने स्वतः मनाप्रमाणे वाटा निवडून फौजदार झाला आहे. सुळेवाडी सारख्या छोट्या गावात वैभव ने कमाल केली असून पहिला फौजदार होण्याचा मान मिळवला आहे. मला लहान पणापासून पोलिस वर्दीची आवड अन् आकर्षण होते. घराच्या स्थितीमुळे इंजिनिअर झालो. पण मन रमले नाही. माझ्या यशात आईचा वाटा असल्याचे वैभव सांगतो. तर मुलांना पुस्तके घेण्यासाठी पैसे नव्हते. वैभवने कोणताही हट्ट केला नाही. मोलमुजरी करून कष्ट केले. स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, वैभव फौजदार होईल. त्याने केलेल्या कष्टाला फळ आले असल्याचे वैभवच्या आईने सांगितले.