प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Pune Crime:ही घटना मॅट्रिमोनिअल साईट्सवरील फसवणुकीचं एक गंभीर उदाहरण आहे. लग्नासाठी ऑनलाईन ओळख वाढवताना किती काळजी घेणं आवश्यक आहे, याची जाणीव या प्रकाराने झाली आहे.
Pune Crime: लग्नाचं आमिष देत 10 लाख रुपये उकळले आणि नंतर लग्नाला नकार देत विवाहित असल्याचं सांगितल्यानं पुण्यात बिबवेवाडीत 25 वर्षीय महिला डॉक्टरने क्लिनिकमध्येच औषध घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर मॅट्रीमोनी साईटवरून होणाऱ्या फसवणूकीच्या घटनांमध्ये होणाऱ्या वाढीकडे लक्ष वेधले जात आहे. (Pune Crime) दरम्यान, पुण्यात 25 वर्षीय डॉक्टर महिलेची मॅट्रीमोनिअल साईटवरून तरुणाशी ओळख झाली. मग या तरुणाशी मैत्री झाली.भेटीगाठी वाढल्या आणि पल्लवी या तरुणाशी लग्नाची स्वप्न रंगवू लागली. प्रेमात आकंठ बुडालेल्या पल्लवीनं हक्काचं माणूस समजून कुलदीपला 10 लाख रुपये दिले. पण तिला पुसटशीही कल्पना नव्हती की हाच कुलदीप तिच्या मृत्यूचं कारण ठरेल. (Matrimony Fraud)10 लाख रुपये मिळताच कुलदीपनं आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. लग्नाची विचारणा करताच टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. नंतर आपलं लग्न झाल्याची कबुली देत त्याची बायको गर्भवती असल्याचं कुलदीपनं पल्लवीला सांगितलं. डॉक्टर असलेल्या पल्लवीला हा मानसिक धक्का सहन झाला नाही. आपण फसवले गेलो या धक्क्यातून न सावरू शकलेल्या पल्लवीनं क्लिनिकमध्येच विषारी औषध पिऊन जीव संपवला. पुण्यातल्या बिबवेवाडीत घडलेल्या या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मॅट्रिमोनिअल साईटवरून फसवणूक
विवाहित असताना अविवाहित असल्याचं भासवत या तरुणानं लग्नाचं आमिष देऊन पल्लवीकडून 10 लाख रुपये घेत लग्नाला नकार दिला. पल्लवीच्या आत्महत्येनंतर हा सगळा प्रकार समोर आला. जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रीमोनिअल वेबसाईटवरून कुलदीपने पल्लवीशी संपर्क करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लाखो रुपये लुटल्याची ही घटना मोठी धक्कादायक आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात कुलदीप सावंतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.पैसे घेतल्यानंतर कुलदीपने पल्लवीला सांगितलं की त्याचं आधीच लग्न झालं असून त्याची पत्नी गर्भवती आहे. याचा पल्लवीला प्रचंड मानसिक ताण आला. या ताणामुळे तिने क्लिनिकमध्येच विषारी औषध घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. या घटनेने मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सच्या वापरावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवरील विश्वासाला धक्का
ही घटना मॅट्रिमोनिअल साईट्सवरील फसवणुकीचं एक गंभीर उदाहरण आहे. लग्नासाठी ऑनलाईन ओळख वाढवताना किती काळजी घेणं आवश्यक आहे, याची जाणीव या प्रकाराने झाली आहे. विश्वासघाताचे असे प्रकार टाळण्यासाठी फक्त ऑनलाईन माहितीवर विसंबून न राहता, समोरच्या व्यक्तीची सत्यता तपासणं अत्यंत गरजेचं आहे.
हेही वाचा: