MPSC चा घोळ कायम, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतरही 416 उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या
राज्यसेवा परीक्षेतून 2020 साली वर्ग 1 आणि वर्ग 2 साठी परीक्षा घेण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर उत्तीर्ण 416 विद्यार्थ्याना नियुक्त्या देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
मुंबई : राज्यसेवेतून 2020 साली उत्तीर्ण झालेल्या 416 उमेदवाराच्या नियुक्त्या आद्याप रखडलेल्याच आहेत. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची या नियुक्ती आदेशावर सही होऊनही यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. ही सर्व प्रक्रिया या 29 ऑक्टोबरला पूर्ण झाली असली तरी या नियुक्त्या का देण्यात येत नाहीत असा सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थी हवालदिल झाल्याचं दिसत आहेत.
राज्यसेवा परीक्षेतून 2020 साली वर्ग 1 आणि वर्ग 2 साठी परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये अंतिम 416 विद्यार्थी पात्र ठरवण्यात आले होते. पण सुरुवातीला कोरोना आणि नंतर मराठा आरक्षणामुळे या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाली नाही. मराठा आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर या यादीमध्ये बदल करण्यात आला आणि पुन्हा निकाल लावण्यात आला. त्यावेळी या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्त्या देण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं.
नंतरच्या काळात उमेदवारांच्या वैद्यकीय रिपोर्टचे कारण सांगून त्यांना ताटकळत ठेवण्यात आलं. सामान्य प्रशासन विभागाने ही फाईल क्लिअर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी पुढे पाठवण्यात आली. मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर चार दिवसात या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येतील असं राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या सहीला एक महिना उलटून गेला तरी अद्याप नियुक्त्या मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
सरकार या प्रकरणी केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी केला आहे. या आधीच्या सर्व बॅचेसना वैद्यकीय रिपोर्ट आणि कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना नियुक्ती मिळाली आहे आणि प्राशिक्षणाला पाठवण्यात आलं आहे. पण 2020 च्या बॅचला आणखी किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल हे स्पष्ट झालं नाही.
संबंधित बातम्या :