Mpox जगभरात पसरतोय, High Risk देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर प्रोटोकॉल लागू करा; पृथ्वीराज चव्हाणांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Prithviraj Chavan Letter: काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. जगभरात प्रादुर्भाव वाढणाऱ्या मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर राज्यात उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
Prithviraj Chavan Letter to CM On Monkey Pox : मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं सध्या काढता पाय घेतलाय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच आता जगात नव्या आजारानं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळतंय. जगभरात मंकीपॉक्स आजारानं थैमान घातलं आहे. तब्बल 70 हून अधिक देशांत मंकी पॉक्स आजाराचा फैलाव झाल्याची माहिती मिळत आहे. मंकी पॉक्सच्या प्रकोपामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य आणीबाणीही जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. तसेच, जगभरात प्रादुर्भाव वाढणाऱ्या मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर राज्यात उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्र ट्वीट केलंय. त्यांनी ट्वीट करताना म्हटलं आहे की, "Mpox विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारी पोहोचला आहे. High risk देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. #Mpox #StaySafe"
Mpox विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारी पोहोचला आहे. High risk देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. #Mpox #StaySafe pic.twitter.com/sZNOUM37Z5
— Prithviraj Chavan (@prithvrj) August 17, 2024
पृथ्वीराज चव्हाणांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
मंकीपॉक्स व्हायरसच्या वाढत्या धोक्याकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. अलीकडेच आपल्या देशासमोर कोविड-19 व्हायरस सोबत लढण्याचं मोठं आव्हान आहे. लाखो कोविड योद्ध्यांच्या अथक आणि निस्वार्थ प्रयत्नांमुळे आम्ही त्या संकटावर मोठ्या खर्चानं मात केली आहे. WHO नं अलिकडेच Mpox ला 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' घोषित केलं आहे. आफ्रिकेत उगम झालेला हा व्हायरस आता वेगानं पसरत आहे. मंकीपॉक्स आता पाकिस्तानात पोहोचला आहे. आपल्या देशात त्याचा प्रवेश आणि प्रसार रोखण्यासाठी सरकारनं सक्रिय पावलं उचलावीत, अशी मी आग्रही विनंती करतो. हे लक्षात घेऊन, मी शिफारस करतो की, मुंबई विमानतळावर चाचणी आणि विलगीकरण सुविधांची अंमलबजावणी उच्च संसर्ग असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी केली जावी. ही काळजी कोविड-19 दरम्यान योग्य प्रकारे घेण्यात आलेली नव्हती. वेळेवर काळजी घेणं महत्वाचं आहे. कारण एखाद्या संक्रमित व्यक्तीचा शोध न घेता त्याला देशात येऊ दिल्यास, गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
मंकी पॉक्सची लक्षणं काय?
मंकी पॉक्स आजारानं आता जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनानंतर आता पुढची महामारी मंकी पॉक्स ठरू नये, अशी भिती जगभरातील अनेक शास्त्रज्ञ करत आहेत. दरम्यान, या आजाराची लक्षणं जर वेलीच लक्षात आली तर हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे या आजाराची लक्षणं काय आहेत? सविस्तर जाणून घेऊयात...
0-5 दिवसांच्या दरम्यान ताप, डोकेदुखी आणि घशाला सूज येणं. ताप आल्याच्या दोन दिवसांत त्वचेवर पुरळ उठतात. पुरळ चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर येतात. तसेच, हाता पायांच्या तळव्यांवरही पुरळ येऊ शकतात. डोळ्यांना संसर्ग होतो, तसेच, डोळ्याच्या कॉर्निया आणि जननेंद्रियाच्या क्षेत्रावर देखील परिणाम करतं.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )