Maharashtra Monsoon Session 2023: विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून; 15 दिवसाचं अधिवेशन होणार
Maharashtra Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली. 17 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान होणार अधिवेशन
Monsoon Session of Maharashtra Legislative Assembly: महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची (Maharashtra Monsoon Session 2023) तारीख ठरली आहे. यंदाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) 17 जुलैपासून सुरु होणार असून ते 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हे अधिवेशन मुंबईत (Mumbai News) पार पडणार असून 15 दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, 17 जुलै पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) देखील उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आला. अजित पवारांच्या बंडानंतर मात्र राज्याच्या राजकारणाची समीकरणं बदलली आहेत. एक वर्षापूर्वी शिवसेनेत बंड झाल्यानंतर राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष उद्भवला होता. त्याचे पडसाद यापूर्वीच्या अधिवेशनांमध्ये पाहायला मिळाले होते. आता अजित पवारांच्या बंडानंतरही राज्याच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद पाहायला मिळणार आहेत.
राज्याचा विरोधी पक्षनेता कोण?
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्याचं विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे होतं आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार होते. पण आता अजित पवारांनीच बंड केल्यामुळे राज्याचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी अधिवेशनाच्या आधी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बैठक घेऊ, ज्याची संख्या जास्त असेल त्याला विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळेल, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.