मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र येणार का? मनसेचा 5 तारखेला, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा 7 तारखेला मोर्चा
मराठी भाषेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या वतीनं येत्या 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई : मराठी भाषेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या वतीनं येत्या 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं 7 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आणि हिंदी विरोधातील मोर्चा हा दोन्ही पक्षांनी मिळून एकत्र काढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मनसे कडून 6 तारखेचा मोर्चा हा आषाढी एकादशी असल्याने 5 जुलै रोजी नियोजित करण्यात आला आहे.
मोर्चासाठी मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा निमंत्रण
5 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मनसेने सर्व मराठी भाषिकांना त्यासोबतच सर्वपक्षीयांना आणि विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा निमंत्रण दिलं आहे. मराठी भाषेसाठी आणि या हिंदी सक्तीच्या विरोधी एकत्र यावं यासाठी हे निमंत्रण देण्यात आलं आहे. तर दोन्ही मोर्चे एकाच दिवशी एकच भव्य मोर्चा निघावा यासाठी मनसे कडून जेवढा प्रयत्न केला जातो तेवढ्याच ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सुद्धा प्रयत्न केला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दोन्ही पक्षाचा एकत्र मोर्चा निघणार का?
त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीने मात्र याआधीच ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना सात जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना काँग्रेस यांनी पाठिंबा देत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना सुद्धा मनसेसोबत पाच तारखेला मोर्चात सहभागी होणार का? दोन्ही पक्षाचा एकत्र मोर्चा निघणार का? मनसेच्या मोर्चाला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार का? हे पहावं लागेल.
कुठल्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा
हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटलं तर ते (उद्धव ठाकरेंची शिवसेना) पण आलेच. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्या लोकांशी बोलणार. कुठल्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला 6 जुलैला कळेल,असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, आता मोर्चा 5 जुलैला निघणार आहे. पहिलीच्या वर्गापासून अभ्यासक्रमात हिंदीचा समावेश करण्याच्या मुद्याला महाराष्ट्रातून विरोध वाढत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत 6 जुलै रोजी पहिलीपासूनच्या अभ्यासक्रमात हिंदीच्या समावेशाविरोधात मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता मोर्चा 5 जुलै रोजी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या मोर्चाची तारीख बदलली, 6 ऐवजी 5 जुलैला मोर्चा, दोन ऐवजी एकाच मोर्चासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा
























