'खासदार अमोल कोल्हे यांचं काम म्हणजे वराती मागून घोडे'- सदाभाऊ खोत
अमोल कोल्हे सिनेमात काम करणं वेगळं आणि प्रत्यक्षात काम करणं वेगळं असतं, अशी टीका मदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
मुंबई- बैलगाडा शर्यतीवर बंदी 2011 साली घालण्यात आली होती. त्यावेळी कृषीमंत्री कोण होत हे जरा खासदार अमोल कोल्हे यांनी आठवावं. त्यावेळी बैल हा प्राणी संरक्षित गटातून काढणं तत्कालीन कृषी मंत्र्यांना शक्य होतं परंतु त्यांनी ते केलं नाही. खासदार अमोल कोल्हे त्यावेळी का बोलले नाहीत. खासदार अमोल कोल्हे सिनेमात काम करणं वेगळं आणि प्रत्यक्षात काम करणं वेगळं असतं, अशी टीका मदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. खोत म्हणाले की, जर त्यावेळी त्यांनी आवाज उठवला असता तर ठीक होत. परंतु त्यावेळी ते गप्प होते. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळी विधानसभेत आणि विधानपरिषदेत ठराव पास करून घेतला होता. नंतर हा विषय सुप्रीम कोर्टात गेला त्यामुळे बैलगाडा शर्यत बंदी उठवावी ही मागणी आम्ही आधीपासूनच लावून धरली आहे. खासदार अमोल कोल्हे यांचं वराती मागून घोडे असला प्रकार झाला आहे. त्यांनी लक्षात घ्यायला हवं की वरात केव्हाच पुढे निघून गेली आहे, अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी खासदार अमोल कोल्हे यांचा बैल गाडा शर्यतीवरील मागणीचा समाचार घेतला.
याबाबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, आम्ही येत्या 20 तारखेला आटपाडी जवळच्या झरे या गावात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य बैलगाडा शर्यत घेणार आहोत. राज्यभरातून याठिकाणी शर्यतीसाठी शेतकरी येतील. 50 हजारांच्या आसपास शेतकरी असतील. याठिकाणी जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सरकर जबाबदार असेल. देशात बैल गाडा शर्यतीबाबत तामिळनाडू सरकार, कर्नाटक सरकारने स्वतंत्र निर्णय घेतला आहे. मग महाराष्ट्रात का नाही घेतला जात. मागच्या तीन वर्षांपासून सुप्रीम कोर्टात निर्णय पेंडिंग आहे. सुनावणीसाठी किमान मागणी करणं गरजेचं होतं. ते देखील यांनी केलं नाही. सध्या तालिबान्यांनी जशी शहरं ताब्यात घेतली आहेत तशी सध्या आमच्या झरे गावात परिस्थिती पाहिला मिळत आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी गावांना वेढा दिला आहे. माझं आता स्पष्ट मत आहे की, कोरोनाच्या स्मशानभूमीतुन सरकारने बाहेर यायला हवं. कितीवेळा तुम्ही कोरोनाचे कारण पुढं करणार आहात.
ते म्हणाले की, अमोल कोल्हे आज झोपेतून जागे झाले आहेत. फडणवीस सरकारने विधान सभेत आणि विधान परिषदेत कायदा पारित केला आहे. केवळ केंद्राच्या दारात चेंडू ढकलण्याचा प्रयत्न सध्या अमोल कोल्हे करत आहेत. त्यांची संसदेत हुशार आणि अभ्यासू खासदार अशी ओळख आहे. तरी देखील त्यांचं वराती मागून घोडे आहेत. त्यांना लक्षात नाही आलं की वरात आधीच निघून गेली आहे. सिनेमात काम करणं वेगळं ग्राऊंडवर काम करणं वेगळं असत खासदार साहेब. कोरोना संपल्यानंतर बैलगाड्या सुरू करूयात असं शशिकांत शिंदे म्हणत आहेत. मात्र मला हे लक्षात येत नाही की ज्यावेळी फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार बनलं त्यावेळी अध्यक्षाची निवड गुप्त मतदान पद्यतीने व्हावी की खुल्या पद्धतीने व्हावी अशी मागणी करण्यासाठी तज्ञ वकील नेमले सुनावण्या 8 दिवसांत केल्या. मग बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबतची याचिका 2 वर्षांपासून पेंडिंग आहे तिथं का लक्ष दिलं नाही. जिथं मलिदा खायचा आहे तिथं तुम्ही पुढं. सामान्य माणसांच्या प्रश असतो त्यावेळी तुम्ही कुठं असता. झोपेचं सोंग कशासाठी घेता. आम्ही 20 तारखेला शर्यत घेणार आहोत. राज्यभरातून याठिकाणी शर्यतीसाठी शेतकरी येतील. 50 हजारांच्या आसपास शेतकरी असतील. याठिकाणी जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सरकर जबाबदार असेल, असंही खोत म्हणाले.