Pune News : अखेर 12 दिवसांनी 2 वर्षांचा चिमुरडा आईच्या कुशीत परतला; पुणे रेल्वे स्थानकावर झालं होतं अपहरण
पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा शोध घेण्यात लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे.

Pune baby Kidnap : पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून (pune) अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा शोध घेण्यात लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे. अपहरण झाल्यानंतर 12 दिवसांनी बालकाचा शोध लागला. या प्रकरणात एका महिलेसह दोघांना (Crime news) अटक करण्यात आली आहे. विजय अनंत जयस्वाल आणि सुमन शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
10 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अडीच वर्षांचे बालक भूपेश भुवन पटेल याचं अपहरण झालं होतं. पटेल दाम्पत्य पुण्यात उदरनिर्वाहासाठी आले होते. मूळचे झारखंडचे असलेले पटेल दांपत्य त्यांच्या मूळगावी झारखंड येथे निघाले होते. पुणे रेल्वे स्थानक परिसरात आरोपी जयस्वाल आणि शर्मा यांनी पटेल दाम्पत्याशी गप्पा मारल्या. त्यांच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर बाळाला खाऊ आणतो, असे सांगून शर्मा आणि जयस्वाल भूपेशला बरोबर घेऊन रेल्वे स्थानकातून पसार झाले. साय घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी मिळाली. त्यांनी लगेच सूत्रं हलवायला सुरुवात केली. रेल्वे पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला. त्यानंतर पोलिसांनी 12 दिवसांत प्रयत्नांची पराकाष्ठा करत मुलाला शोधून काढलं. पोलिसांनी रांजणगाव परिसरातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सोशल मीडियावरुन आवाहन
बाळाला शोधण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडिया आणि स्टेशन परिसरातील अनेक रिक्षाचालकांना आवाहन केलं होतं. शिवाय पोलिसांचेही सात पथकं कामाला मागली होती. सोशल मीडियामार्फत अनेकांना आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळे पोलिसांबरोबरच अनेक सामान्य नागरिकांनी देखील या शोधमोहिमेत महत्वाची कामगिरी बजावली.
बाळाचं कुटुंब तणावात
आपल्या लाडक्या बाळाचं अपहरण झालं असं कळल्यावर पटेल कुटुंबिय चिंतेत होते. या बाळासंदर्भात तक्रार केल्यावर बाळाला शोधणं रेल्वे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. बाळाचे आई-वडील रोज पोलीस स्टेशनच्या चकरा मारत होते. मात्र 10 दिवस होऊन गेल्यावरही बाळ सापडत नसल्याने पटेल कुटुंबीयांच्या घरात तणावाचं वातावरण होतं. मात्र नातेवाईकांनी धीर देत त्यांना समजावलं. त्यानंतर पोलिसांनीही त्यांना विश्वास दिला होता. त्यानंतर अखेर चिमुरडा 12 दिवसांनी घरी परतला आहे.
पोलिसांची उत्तम कामगिरी
10 डिसेंबरला रात्री ही घटना घडली होती. त्यानंतर पटेल कुटुंबियांनी लगेच पोलिसांत धाव घेतली. त्यांनी पोलिसांना बाळाच्या फोटोसहित घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी आपली यंत्रणा कामाला लावली. पुणे जिल्ह्यात सगळीकडे माहिती पाठवली. पोलिसांच्या उत्तम कामगिरीने चिमुरडा आईच्या कुशीत परत येऊ शकला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
