बारावी निकालानंतर पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाचं काय? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्वाची माहिती
बारावीचे निकाल लागल्यानंतर पदवीच्या प्रवेशाचं काय? असा प्रश्न राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आता अंतर्गत मुल्यमापन करुन बारावीचे निकाल लागणार आहेत. बारावीचे निकाल लागल्यानंतर पदवीच्या प्रवेशाचं काय? असा प्रश्न राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. बारावी बोर्डाचे निकालाबाबत निकष ठरवून निकाल जाहीर करण्यासाठी पुढील काही दिवसात लागतील. त्या अनुषंगाने प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. इस्लामपूर येथील तहसिलदार कार्यालयात प्रथम वर्ष पदवी प्रवेशा संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील प्रथम वर्ष पदवी प्रवेशासंदर्भात आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक संपन्न झाली. यावेळी प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता, संचालक धनराज माने, सर्व कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बारावी परीक्षांचे निकाल देताना त्याचे अंतर्गत मूल्यमापन होणार आहे. त्याबाबतचे निकष लवकरच शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर केले जातील. त्यात निकालाची टक्केवारी बघितली जाईल. अभियांत्रिकी, फार्मसी, लॉ या सारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा दरवर्षी मे महिन्यात घेण्यात असते. मात्र, यावर्षी कोरोना महामारीमुळे सर्वच परीक्षा आणि निकाल पुढे ढकल्याने बारावीच्या निकालानंतर या परीक्षेबाबतचा नियोजन केले जाणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, 'बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल विविध प्रोफेशनल शिक्षणाकडे जाण्याचा असतो. यासाठी सीईटी परीक्षा महत्वपूर्ण असते. या सीईटी च्या परीक्षा आयोजित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर तत्काळ प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना समान गुण मिळतील, अशा काही अडीअडचणी सोडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होईल याबाबत निर्णय घेण्यात येतील'.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI