मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात, 'वर्ल्ड सेंट्रल किचन'च्या सहयोगाने दररोज 15,000 थाळ्या पुरविणार
मास्टरशेफ संजीव कपूर यांनी चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात वर्ल्ड सेंट्रल किचनच्या सहयोगाने दररोज 15,000 थाळ्या पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबई : मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील चिपळूण आणि महाड भागाला जोरदार तडाखा दिला आहे. मास्टरशेफ संजीव कंपूर यांनी शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून या टीमने कालपासून (30 जुलै) पूरग्रस्तांना दररोज एकूण 15,000 थाळी ताजे जेवण पुरवण्यास सुरुवात केली आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना, पद्मश्री पुरस्कार विजेते शेफ संजीव कपूर म्हणाले, “महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले तर अनेकांची घरेही गमावली. चिपळूण आणि महाडही पूरग्रस्त आहेत. या भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरवण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही. माणुसकीच्या दिशेने टाकलेले एक लहानसे पाऊलदेखील अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल, अशी आम्हाला खात्री आहे. या पुढाकारातून आम्ही बाधित कुटुंबियांच्या मूलभूत पौष्टिक गरजा भागवण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न पुरवत आहोत. या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
कोविड-19 ने संपूर्ण देशाला विळखा घातला असताना, मास्टरशेफ संजीव कपूर हे ताज हॉटेल्स आणि वर्ल्ड सेंट्रल किचन यांच्या सहकार्याने कोरोना विषाणूविरुद्ध अखंडपणे काम करणाऱ्या हेल्थकेअर वॉरियर्सना ताजे पौष्टिक अन्न पुरवत आहेत. आतापर्यंत शेफ कपूर आणि वर्ल्ड सेंट्रल किचनचे शेफ जोस अँड्रेस यांनी दिल्ली, गुरुग्राम, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, गोवा, लखनौ आणि वाराणसी या शहरांसह इतर ठिकाणी 10 लाखाहून अधिक थाळी जेवण पुरवले आहे.
'फुड इज लव्ह' हा संदेश देत भारताचे मास्टरशेफ संजीव कपूर आणि स्पॅनिश-अमेरिकन मास्टरशेफ होजे अँड्रेज यांनी वर्ल्ड सेंट्रल किचनच्या माध्यमातून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशभरातील मेडिकल फ्रंटलाईन वर्कर्ससाठी जेवण पोहचवण्याचं काम केलं.
महत्वाच्या बातम्या :