महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जनतेची एकजूट मजबूत करूया, माकपच्या शिष्टमंडळाची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
Marxist Communist Party : महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी लवकरात लवकर आघाडीची सर्वसमावेशक बैठक घेण्यात येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी माकपच्या शिष्टमंडळाला दिलं.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या निवडणुकीत महाराष्ट्राचा स्वाभिमान जोपासला जाणार की त्याची राखरांगोळी होणार, याचा फैसला होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जनतेची भक्कम एकजूट करूया असे एकमत आज शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि माकपचे राज्यस्तरीय नेतृत्व यांच्या दरम्यान मातोश्रीवर झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आले. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीविषयी मतांची देवाणघेवाण करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेने भाजप आघाडीचे तीन तेरा वाजवून महाविकास आघाडीला विजयी केले, त्याचीच जोरदार पुनरावृत्ती येत्या विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी सर्वजण एकजुटीने कार्य करतील आणि राज्यात सत्तांतर घडवून आणतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. माकपच्या प्रतिनिधीमंडळात पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव डॉ. उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आणि जे. पी. गावीत, आमदार विनोद निकोले, पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य डॉ. अजित नवले व डॉ. डी. एल. कराड यांचा समावेश होता.
महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी लवकरात लवकर आघाडीची सर्वसमावेशक बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.
या बैठकीत जनतेच्या विविध प्रश्नांवर व्यापक आणि प्रदीर्घ चर्चा झाली. दूध दर आणि शेतकरी कर्जमाफीसाठी अ. भा. किसान सभेच्या नेतृत्वाखाली चाललेल्या आंदोलनास श्री. उद्धव ठाकरे यांनी पूर्ण पाठिंबा देत आपला पक्ष त्यात सक्रियपणे सहभागी होईल, अशी ग्वाही दिली.
राज्यातील कामगारांच्या समस्यांवरही बैठकीत चर्चा झाली. विशेषतः जुनी पेन्शन योजना, कंत्राटी कामगार, योजना कर्मचारी यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी जबरदस्त मोहीम उभारण्यावर बैठकीत विचारविनिमय झाला. तसेच, शेतकऱ्यांनी त्यांच्यावर लादलेले काळे कायदे जसे उधळून लावले त्याप्रमाणेच कामगारांवर लादलेल्या श्रम संहिता रद्द करण्यासाठी पुढाकार घेण्याचा मनोदय श्री. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
'माकप'च्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार व राज्य अध्यक्ष मा. जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे राज्य अध्यक्ष मा. नाना पटोले यांची यापूर्वीच भेट घेऊन वरील मुद्यांवर चर्चा केली होती.
ही बातमी वाचा: