Maratha Reservation : संभाजीराजेंनी उपोषण करु नये, अजित पवारांनी केलं आवाहन
येत्या 26 फेब्रुवारीपासून खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणार आहेत. मात्र, संभाजीराजे यांना उपोषण करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, येत्या 26 फेब्रुवारीपासून खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानात ते उपोषणाला बसणार आहेत. मात्र, खासदार संभाजीराजे यांना उपोषण करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना केले आहे. याआधी आपण वेगवेगळ्या प्रकारे मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकलेले नाही. देशाच्या पंतप्रधानांना भेटून आम्ही मराठा आरक्षणासाठी बाजू मांडलेली असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात ढोल ताश्यांची गजरात साजरी करण्यात आली. शिवनेरी गडावर शासकीय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी संभाजीराजे यांना उपोषण न करण्याची विनंती केली आहे.
आरक्षणाचा प्रश्न सुटायचा असेल तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा, हे आपण सगळे जाणतो. कारण प्रश्न एका कुठल्या राज्याचा नाही. तामिळनाडूत जसे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात आले आहे, तसे केंद्राने कायद्यात बदल करून आरक्षण द्यावे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकार या संदर्भात काहीही हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे माझी भूमिका आता मी बदलत आहे. येत्या 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. मी नेहमीच शाहू महाराजांचा वारसा जपला आहे. मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे. आम्हाला टिकणारे आरक्षण हवे आहे, तशी आम्ही वेळोवेळी मागणीही केली आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांना आरक्षण कशामुळे गेलं हेही सांगितले आहे. आरक्षण देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे. मात्र यावर काहीही तोडगा निघालेला नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल होतं. परंतू खुप दिवसांनंतर याचिका दाखल केली आहे. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतू अजून काहीच केलं नसल्याचे संभाजीराजेंनी सांगितले होते. दरम्यान, अजित पवार यांनी संभजीराजेंना उपोषण न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांच आवाहनला संभाजीराजे कसा प्रतिसाद देणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: