Video: मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याला काळं फासलं; आधी शाल घालून सत्कार, पुन्हा दिला इशारा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, सरसकट सगेसोयरे आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे, या मागण्यांसह मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे
छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांसह काहीजण थेट भूमिका घेऊन जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोधही करत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेत विखे पाटील यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचे म्हटले. त्यानंतर, दुसरीकडे कधीकाळी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या मराठा आंदोलनातील (Maratha Reservation) डॉ. रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. तारक यांना काळे फासतानाचा व्हिडिओ (Viral video) चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचं दिसून येत आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, सरसकट सगेसोयरे आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे, या मागण्यांसह मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. जरांगे यांच्या मागणीवर सरकारने 1 महिन्याचा अवधी मागितला असून कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले होते. आता, दोन्ही नेत्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. पण, या उपोषणाची झळ सामाजिक सलोखा बिघडवण्यात बसत असल्याचं दिसून येत आहे. कारण, जरांगे यांच्या उपोषणास विरोध केल्यामुळे त्यांच्याच जुन्या सहकाऱ्याला काळं फासण्यात आलं आहे.
पेशंट बनून आले, काळं फासलं
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध करणारे पत्र मी 2 महिन्यांपूर्वी दिले होते, 2 महिन्यांनी ही घटना घडली आहे. आज सकाळी पेशंट म्हणून हे लोक माझ्याकडे आले. तसेच, वाढदिवस म्हणून सत्कार करतो म्हटले, पण त्यांना माझा वाढदिवस आज नाही, असे सांगितल्यानंतरही त्यांनी माझा सत्कार केला. त्यानंतर, चेहऱ्याला काळ फासलं आहे, यामागे कोण आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. तारक यांनी केली आहे.
छ. संभाजीनगर : मनोज जरांगे यांचे जुने सहकारी डॉ. रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं, झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळ pic.twitter.com/clp6bvkez3
— ABP माझा (@abpmajhatv) June 24, 2024
जिल्हाधिकारी यांना दिले होते निवेदन
मनोज जरांगे यांचे कधीकाळचे सहकारी डॉ. रमेश तारक यांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. अंतरवाली सराटमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केल्याने हे काळं फासण्यात आल्याचा आरोप तारक यांनी केला आहे. विशेष म्हणजे डॉ. तारक यांनी जरांगेंच्या उपोषणाला आंतरवाली परवानगी देऊ नये, असे पत्र जिल्हाधिकारी यांना लिहले होते. तसेच, ग्रामस्थांच्या सह्या घेऊन या मागणीचे निवेदनही जालन्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावातच आपलं उपोषण केलं. आता, त्याच विरोधाचा राग धरुन, झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रमेश तारक यांच्या चेहऱ्यावर काळी शाई ओतून चेहऱ्याला काळं फासलं.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण गढूळ बनत असून दोन्ही समाजातील वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांनी एकत्रित येऊन सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन करणे आवश्यक असल्याची अपेक्षा काही जाणकरांकडून करण्यात येत आहे.