मनोज जरांगेच्या बीड शहरातील शांतता रॅलीत सहभागी होणाऱ्या मराठा समाजासाठी अडीच हजार किलो खिचडी, ५० हजार पाण्याच्या बाटल्या
Manoj Jarange Beed Rally: बीडमध्ये मनोज जरांगे यांचे दीड क्विंटल फुलांच्या हराने त्यांचे स्वागत होणार असल्याचे सांगण्यात येतंय. मराठा आरक्षण मागणीसाठी बीड शहरात मराठा समाज लाखोंच्या संख्येने उतरणार आहे.
Manoj Jarange Beed Rally: बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली निघणार आहे. दरम्यान, शहरात लाखोच्या संख्येने मराठा समाज रॅलीत (Maratha Reservation Rally Beed) सहभागी होणार असून रॅलीत सहभागी होणाऱ्या समाज बांधवांना जेवणासाठी तब्बल अडीच हजार किलो खिचडी बनवली जाणार आहे. तसेच 50 हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या मागवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये सभेसाठी दाखल होतील. यावेळी सुभाष रोड परिसरात दीड क्विंटल फुलांच्या हराने त्यांचे स्वागत होणार असल्याचं समोर येतंय. बीड हे मराठा आरक्षणाच्या मागणीचं केंद्रबिंदू ठरलं होतं, त्यामुळे लाखाेंच्या संख्येने मराठ्यांची एकजूट दाखवण्याकरीता मराठा समाज रस्त्यांवर उतरणार आहे.
लाखोंच्या संख्येत जमणाऱ्या मराठा बांधवांच्या जेवणाची सोय
बीड शहरात आज होणाऱ्या मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅलीसाठी एकत्र येणाऱ्या मराठा समाजाच्या जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी मराठा समाज बांधवांनी पुढाकार घेतला आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्या मराठा समाजबांधवांसाठी अडीच हजार किलोंची खिचडी बनवण्यात येत आहे. तसेच पिण्यासाठी ५० हजार पाण्याच्या बाटल्या मागवण्यात आल्याचे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितले. रॅली संपेपर्यंत मराठा बांधवांना काहीही कमी पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असेही ते म्हणाले. मराठा समाजाच्या जेवणासह आरोग्य शिबिरही ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मनोज जरांगेंचे स्वागत दीड क्विंटल फुलांच्या हाराने
बीडमधील रॅलीसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी केली जात असून दीड क्विंटल फुलांच्या हाराने मनोज जरांगे यांचे स्वागत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शहरात भगव्या पताका तसेच मनोज जरांगे यांची प्रतिमा असणारे मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. तसेच सत्कारासाठी मोठे क्रेन लावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बीडमधील मनोज जरांगे यांच्या सभेला सर्व परवानग्या मिळाल्या
बीड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मनोज जरांगे यांच्या सभेला सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस दल सतर्क झाला असून अडीचशे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एस आर पी एफ आणि आरसीपीच्या तीन लाटून नियुक्त करण्यात आल्या आहेत.
मागील दोन दिवसांपासून बीडमधील सभेवरून मिळणाऱ्या परवानग्यांवरून संभ्रम असल्याने प्रशासनासह पोलिसांना धारेवर धरण्यात आले होते. लातूरमधील झालेल्या सभेत आंदोलक मनोज जरांगे यांनी सभेला नाकारलेल्या परवानगीवरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली होती.
बीड शहरातील शाळांना सुट्टी जाहीर
मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज बीड शहरामध्ये शांतता रॅली आणि जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बीड शहरातील सर्व शाळांना आज एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली. याबाबतचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना पाठवले असून त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: