Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनिष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर
Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे मनीष दळवी यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी भाजपचेच अतुल काळसेकर विजयी झाले.
Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे मनीष दळवी (manish dalvi) यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी भाजपचेच अतुल काळसेकर (Atul Kalsekar) विजयी झाले. नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी हे नारायण राणे (Narayan Rane) यांचे निकटवर्तीय मानले जातात. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचं अभिनंदन केलं आहे.
महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हिक्टर डॉन्टस यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक भरला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना खरमळे यांनी काम पाहिलं. ही प्रक्रिया जिल्हा बँकेच्या ओरोस प्रधान कार्यालयात पार पडली. ही निवडणूक खूप चर्चेत आली होती. त्यामुळं जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादात मोठ्या प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत राणेंनी जिल्हा बँकेत पुन्हा सत्ता मिळवली आहे. निवडणुकीत 11 विरूद्ध 8 अशा फरकाने भाजपने सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.
महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत यांचा देखील राणे समर्थक असलेले विठ्ठल देसाई यांनी पराभव केला होता. अध्यक्षपदासाठी मनिष दळवी यांच्यासह भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान संचालक अतुल काळसेकर, विठ्ठल देसाई यांचीही नावं चर्चेत होती. कणकवलीतील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर चाकू हल्ला प्रकरणात मनिष दळवी यांचं नाव चर्चेत आलं होतं.
दरम्यान या निवडणुकीच्या आधी जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या बाहेर राणे समर्थकांनी नाद करायचा नाय अश्या आशयाचा बॅनर लावला होता. सोबतच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कणकवलीत झालेल्या संतोष परब हल्ला प्रकरण राज्यभर गाजलं. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. मात्र भाजपनं जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवलं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून होते. जिल्हा बँकेत 12 विद्यमान संचालकांना पराभव पत्करावा लागला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाची पाच महत्वाची वैशिष्ट्यं; सविस्तर निकाल पाहा एका क्लिकवर
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा