Mahayuti Meeting : नाराजीनाट्यावर शिंदे, फडणवीसांसह अजित पवारांची वर्षावर मध्यरात्री बैठक; नेमकं बैठकीत काय ठरलं?
Varsha Bungalow Mahayuti Meeting : बुधवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर तिन्ही पक्षातील नाराजांना बोलावून त्यांची नाराजी दूरू करण्याचा प्रयत्न झाला.
Varsha Bungalow Mahayuti Meeting : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून (Lok Sabha Election Seat Sharing) महायुतीमधील (Mahayuti) तिन्ही पक्षात नाराजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवारांकडून (Ajit Pawar) नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, बुधवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) तिन्ही पक्षातील नाराजांना बोलावून त्यांची नाराजी दूरू करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी रात्री साडेआठ वाजेपासून तर मध्यरात्रीपर्यंत एकामागून एक अशा अनेक बैठका होतांना पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर रात्री साडेआठच्या सुमारास पहिली बैठक सुरू झाली होती. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची एक राज्यस्तरीय बैठक पार पडली आहे. रात्री 1 वाजता ही बैठक संपली. जवळपास दोन तास बैठक सुरु होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत जागावाटपा संदर्भात शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. मात्र, याचवेळी वर्षावर अनेक राजकीय घडामोडी देखील घडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वर्षा बंगला राजकीय केंद्रबिंदू बनल्याची चर्चा आहे.
वर्षा बंगल्याच्या बैठकीत काय घडलं?
- जवळपास रात्री 8.30 च्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांसह नाशिकचे विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे दाखल झाले. पहिली बैठक हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्री यांच्यात पार पडली. या बैठकीत गोडसे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. तसेच नाशिकची जागा त्यांना मिळेल असे सांगण्यात आले.
- गोडसे यांच्यासोबतची बैठक संपल्यावर सुनील तटकरे यांच्याबरोबर रायगडमधील नाराज आमदार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीचा धर्म पाळत रायगडमधील आमदारांना तटकरे यांना समर्थन देण्याचा सल्ला देण्यात आला.
- रायगडमधील नाराज आमदारांसोबतची बैठक झाल्यावर हातकणंगलेच्या जागेबाबत धैर्यशील माने यांच्याबरोबर बैठक झाली. धैर्यशील माने यांना निशिंत राहण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यांनी या बैठकीत दिला.
- त्यानंतर सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासंदर्भात मंत्री उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. किरण सामंत यांना सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.
- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासंदर्भातील बैठक संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी बैठकीत स्वतः अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार आणि विजय शिवतारे यांना समोरासमोर बसून चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता शिवतारे या बैठकीनंतर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
- अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा यांना महायुतीकडून तिकीट जाहीर करण्यात आल्यानंतर शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ नाराज आहे. अडसुळांची नाराजी दूर करण्याचा देखील प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला. यावेळी सकारात्मक चर्चा झाली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ अमरावतीमधून अपक्ष उमेदवारी भरू शकतात.
- वाशिम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांना डावलण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावना गवळी शेकडो कार्यकर्त्यांसह थेट वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी भावना गवळी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली आहे. मात्र, या चर्चेनंतर भावना गवळींची पुढील काय भूमिका असेल हे गुलदस्त्यात आहे.
- या सर्व बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याच राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत नाराज खासदारांची कशी समजूत काढली जाऊ शकते, त्याचबरोबर जागा वाटप संदर्भात अंतिम चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एप्रिल महिन्यामध्ये राज्यभरात कधी कसं आणि कुठे प्रचार करता येईल या संदर्भात देखील चर्चा झाली. या बैठकीनंतर महायुतीची पहिली यादी जाहीर होऊ शकते. पण याचवेळी ठाणे लोकसभा मतदारसंघावर तोडगा निघाला नसल्याची माहिती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :