एक्स्प्लोर
मंत्रिमंडळाच्या शपथविधिनंतर राज्यभरात जल्लोष; बारामती, नागपूर, बुलढाण्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर संपूर्ण राज्यभरात उत्साहाचे वातावरण असून अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पेचानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं पण मंत्रिमंडळ विस्तारासाठी मात्र मुहूर्त सापडत नव्हता. अखेर आज (30 डिसेंबर) रोजी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. महाराष्ट्र विकास आघाडीतील जवळपास 36 नेत्यांनी आज पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बंड करत भाजपशी सलगी करुन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
राज्यातील सत्तासंघर्षात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यभरात अजित पवारांबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आल्या. एवढचं नव्हे तर सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केला होता. मात्र आज महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सोबतच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात यावी अशी मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे. सोलापूर जिल्हा अजित पवार यांच्यासाठी नवीन नाही. जिल्ह्यात पक्षवाढीसाठी अजित पवार यांनी पालकमंत्री पद घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ : मी शपथ घेतो की... | राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
बारामती, मुंबई आणि परळीतील कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बारामती, मुंबईतील त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. एवढंच नाहीतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
पाहा व्हिडीओ : मी शपथ घेतो की... | काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
अजित पवारांच्या शपथविधीनंतर भोकर मतदार संघात उत्साह
तब्बल दहा वर्षानंतर अशोक चव्हाण पुन्हा मंत्रीमंडळात सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने भोकर मतदारसंघात जल्लोष साजरा करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी फटाकेबाजी करत आनंद साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आपला आनंद साजरा केला आहे. भोकर हा अशोक चव्हाण यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे, त्यामुळे इथल्या समर्थकांत मोठा जल्लोषाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर अशोक चव्हाण हे आजवर लाल दिव्यापासून वंचित होते, त्यामुळे आता त्यांचा मंत्री मंडळात समावेश झाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
नागपूर जिल्ह्याला आणखी 2 कॅबिनेट मंत्री पदं मिळाल्यामुळे जल्लोष
महाविकास आघाडी सरकारचे पहिले मंत्रिमंडळ विस्तार होताच नागपुरात मोठा जल्लोष करण्यात आलाय. आता पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नागपूर जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत नितीन राऊत यांचा शपथ पार पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस कडून अनिल देशमुख आणि काँग्रेसकडून सुनील केदार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील बंगल्यासमोर मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा झाले होते. सुरुवातीला सर्वांनी एकत्रीतरित्या शपथविधी पाहिला त्यानंतर बंगल्यासमोर ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोष सुरु झाला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवत त्यांचा आनंद साजरा केला. तसेच सिव्हिल लाईन्स परिसरातील सुनील केदार यांच्या घरासमोरही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
बच्चू कडूंच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांनी वाटले फोटो
अचलपूर मतदार संघाचे आमदार तथा प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचा शपथविधी सुरू असतांना त्यांचा मतदार संघ अचलपूर येथे प्रहरच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करत पेढे वाटप केले. याव्यतिरिक्त अमरावती, दर्यापूर, चांदूरबाजार मध्ये पण मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शपथ घेतल्यानंतर सिंदखेडमध्ये उत्साह
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याने सिंदखेडराजासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा करत ठेका धरला. डॉ. राजेंद्र शिंगणे हे 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
पाहा व्हिडीओ : मी शपथ घेतो की... | काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात सलग तीनदा विजयी झालेल्या आमदार यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अमरावतीत त्यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. अमरावती जिल्हात वसुधा देशमुख आणि पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांना संधी मिळाली होती. त्यानंतर आता तिसऱ्या महिला मंत्री यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. त्यामुळे अमरावतीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra Cabinet : ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाची ठळक वैशिष्ट्ये
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या एकाही महिलेला संधी नाही; 43 पैकी केवळ तीनच महिला मंत्री
Cabinet Expansion | शपथविधी सोहळ्याला संजय राऊतांची दांडी, आमदार सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत?
...म्हणून राज्यपाल चिडले आणि काँग्रेसच्या के सी पाडवींना पुन्हा शपथ घ्यायला लावली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
महाराष्ट्र
Advertisement