Cabinet Expansion | शपथविधी सोहळ्याला संजय राऊतांची दांडी, आमदार सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. भाऊ सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेना खासदार संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज मंत्रिमंडळाच्या विस्तारालाही संजय राऊत यांनी दांडी मारली. मंत्रिमंडळ विस्तारात बंधू आमदार सुनील राऊत यांना स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत आपली नाराजी उघडपणे दाखवत नसले तरी उद्धव ठाकरेंसोबत ते याबद्दल चर्चा करण्याची शक्यता आहे.
मी शासकीय कार्यक्रमाला जात नाही असं सांगून संजय राऊतांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे. संजय राऊत यांनी बंधू सुनील राऊतही शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित होते. त्यांना फोनही स्विच ऑफ आहे. मंत्रिपद न मिळाल्याने सुनील राऊत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचीही चर्चा आहे.
राऊत कुटुंब नाराज नाही : संजय राऊत
आपण नाराज नसल्याचं संजय राऊत यांनी मंत्रिमंडळ विस्ताराआधी स्पष्ट केलं होतं. सरकार स्थापन करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका निभवली आहे. मी किंवा माझे कुटुंबिय नाराज नाही. आम्ही आयुष्यभर पक्षासाठी काम करणार आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. एक चांगलं मंत्रिमंडळ राज्याचा कारभार करणार आहे. अनुभवी आणि हुशार नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे. हे सर्व मंत्री चांगलं काम करुन राज्याला नवी दिशा देतील, असं संजय राऊत यांनी एबीपी माझीशी बोलताना सांगितलं होतं.
विरोधकांची शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका चुकीची
विरोधी पक्षाने राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर बहिष्कार टाकला आहे. याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, बहिष्कार टाकण्याची अशी पद्धत योग्य नाही. विरोधी पक्ष अशी पद्धत पाडत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला माजी मुख्यमंत्री हजर राहतात, तशी परंपरा आहे. विरोधी पक्ष बहिष्काराचं तंत्र पहिल्या दिवसापासून वापरत असेल तर यातून काय साध्य होणार आहे. राज्याची स्थिती सध्या बिकट आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने एकत्र येऊन काम करण्याची सध्या गरज आहे. राज्याच्या विकासासाठी अनेक मुद्द्यांवर एकमत होणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले
शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (मुंबई) अनिल परब (मुंबई) उदय सामंत (रत्नागिरी) गुलाबराव पाटील (जळगाव) दादा भुसे (मालेगाव, नाशिक) संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ) संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद) शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर) अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद) राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर) शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा) बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती) काँग्रेसचे मंत्री के.सी.पाडवी (धुळे) (अक्कलकुवा, नंदुरबार) अशोक चव्हाण (नांदेड) अमित देशमुख (लातूर) यशोमती ठाकूर (अमरावती) विजय वड्डेटीवार (चंद्रपूर) सुनील केदार अस्लम शेख (मुंबई) वर्षा गायकवाड (मुंबई) सतेज पाटील (राज्यमंत्री) (कोल्हापूर) विश्वजित कदम (राज्यमंत्री) (सांगली) राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे) दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे) धनंजय मुंडे (परळी, बीड) अनिल देशमुख डॉ. राजेंद्र शिंगणे हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर) जितेंद्र आव्हाड (ठाणे) नवाब मलिक (मुंबई) बाळासाहेब पाटील राजेश टोपे प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) (अहमदनगर) दत्ता भरणे (राज्यमंत्री) अदिती तटकरे (राज्यमंत्री) (रायगड) संजय बनसोडे (राज्यमंत्री)