Nashik News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! निसाकाच्या जागेवर आता मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क
Nashik News : निसाकाच्या ड्रायपोर्टला (Dry port Project) दिलेल्या जागेवर आता मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क प्रकल्प उभारला जाणार आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील महत्वाचा समजला जाणारा मात्र मागील दहा वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला निफाड सहकारी साखर (Niphad Sugar Factory) कारखान्याला नवसंजीवनी मिळणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचा (Logistic Park) विषय मार्गी लागला असून लवकरच निसाकाच्या ड्रायपोर्टला (Dry port Project) दिलेल्या जागेवर आता मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क प्रकल्प उभा होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkri) यांनी केली आहे.
निफाड साखर कारखाना सध्या बंद अवस्थेत असतून जिल्हा बँकेने सील केला आहे. मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी 2016 मध्ये निफाड सहकारी साखर कारखान्याच्या 108 एकर जागेवर ड्रायपोर्ट उभा केला जाईल अशी घोषणा केली होती. मात्र आता ओझरला विमानतळा लगतची कार्गो हब व अंबड येथील कंटेनर हब मुळे निसाकावरील नियोजित ड्रायपोर्ट प्रकल्प गुंडाळावा लागला आहे. त्याऐवजी आता मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क साकारला जाणार आहे. जेएनपीटी व एन एच आय यांचा संयुक्त विद्यमाने लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या कामावरच लवकर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे सुमारे 100 एकर जागेवर उभारला जाणारा हा प्रकल्प निसाकासाठी वरदान ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
दरम्यान गेल्या सहा वर्षांपासून घोषणा होऊनही निसाकावरील ड्रायपोर्ट प्रकल्पाला मुहूर्त लागत नव्हता. शिवाय निसाकाची स्थावर मालमत्ता 300 कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. डायपोर्ट प्रकल्प साकारून निसाकावरील कर्जाचा बोजा दूर करण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निसाकाच्या विक्री विभागाची 35 कोटी रुपयांच्या रकमेला सवलत मिळाली होती. मात्र आता केंद्र शासनाने ड्रायपोर्टचा प्रस्ताव गुंडाळला असून आमदार बनकर यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत तेथे मल्टी लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर्फे हा मल्टी लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा आराखडा बनवला जात आहे. लॉजिस्टिक पार्कमध्ये फळे व शेतीमालाच्या निर्यातीचे काम चालणार आहे.
निफाडला ड्रायपोर्ट प्रकल्प व्हावा यासाठी, आमदार दिलीप बनकर यांनी केंद्राकडे पत्र पाठविले होते. त्या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मल्टी लॉजिस्टिक पार्कची घोषणा केली. आमदार दिलीप बनकर म्हणाले की निसर्गावरील प्रस्तावित ड्रायपोर्टचा महत्त्वकांक्षी प्रकल्प कृषी क्षेत्राला वरदान ठरणार आहे. त्यासाठी मंत्री व अधिकाऱ्यांसमेश सतत बैठका घेतल्या पाठपुराव्यानंतर आता केंद्रशासन मल्टी लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे तयारीत आहे. शेतीमाल निर्यातीबरोबरच निसाका परिसर रोजगार निर्मिती होईल त्या प्रकल्पावर लवकरच शिक्कामोर्तब करावे अशी मागणी ही केल्याची त्यांनी सांगितले.
नव्या -जुन्या घोषणेच काय?
विशेष म्हणजे आधीच्या ड्रायपोर्ट प्रकल्पाचे अद्यापही तळ्यात मळ्यात असतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुसरी घोषणा केली आहे. ड्रायपोर्टच्या जागेवर मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क होणार असून ड्रायपोर्ट होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान ड्रायपोर्टची जागा ही थकीत रक्कम वसूलीसाठी एनडीसीसी बँकेने जागा ताब्यात घेतली असून या जमिनीचे मूल्यांकन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने निश्चित झाले आहे. 2018 मध्ये बँकेच्या ताब्यातील जमीन जेएनपीटीने हस्तांतरित करण्यासाठी मान्यता दिली असतांना याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याने नव्या घोषणेचे काय होईल अशीही चर्चा आहे.