ऊन-पावसाचा खेळ! कुठे उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, तर कुठे अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा
Maharashtra Weather Today : उष्णतेच्या लाटेसोबतच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मुंबई : महाराष्ट्रात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. कधी ऊन तर कधी पाऊस असं वातवरण आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील काही भागात तापमानात मोठी वाढ होणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, 6 मे रोजी हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगडसह रत्नागिरी, सांगली, सोलापूरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमान वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याची काळजी घ्या
पुढील 24 तासात महाराष्ट्र आणि गोवा राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 6 मे रोजी मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हवामान कोरडे राहील. आज कोकणात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आज हवामान कसं असेल?
मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 5 मे रोजी लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, उष्णतेच्या लाटेसोबतच नांदेड जिल्ह्यातही ५ मे रोजी सायंकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, चंद्रपूर, विदर्भात काही ठिकाणी 5 मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 6 मे रोजी चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता
विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भात आणि संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत, काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचाही अंदाज आहे. तसेच काही भागात गारपिटी होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, काही भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.