Maharashtra Weather update: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला; कोकणात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा धोका, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather update: सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दोन्ही दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुणे : नैऋत्य मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याने राज्यात जोरदार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित भागात पावसाने जोर धरला (Heavy Rain) आहे. पुढील पाच दिवस पावसाची हीच स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही दाखल झाला आहे. तसेच उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे.
उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणिका रेषा स्थिर असून त्यामुळे कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, तसेच शेतकऱ्यांनीही हवामानाचा विचार करून शेतीचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर नद्या-नाल्यांना पूर आला आहे. आपत्कालीन यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात पावसाचा जोर सातत्याने वाढत असून, पुढील दोन दिवस राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 आणि 21 जून रोजी राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणात अतिवृष्टीचा धोका
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी, तर एखाद्या भागात तीव्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 21 जूनला पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता असून, मध्यम पाऊस कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दोन्ही दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका
पुणे, नाशिक, सातारा या घाटमाथ्यांच्या भागात आज 20 जून रोजी काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस, तर 21 जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा आणि रस्ते बंद होण्याचा संभाव्य धोका असल्याने स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक शहर, अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर या भागांमध्ये 20 जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, 21 जूनला पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत आज 20 जून रोजी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होईल.
कधी, कोणता अलर्ट ?
पुढील पाच दिवस कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
20 ते 22 जून: यलो अलर्ट: रायगड, रत्नागिरी, पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहील.
नाशिकमध्ये पावसाने विश्रांती
काल सायंकाळ पासून नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नाशिकच्या गोदावरीच्या पाणीपातळीमध्ये घट झाली आहे. गोदावरीला आलेली पूर सदृश परिस्थिती ही आता कमी झालेली आहे. दुतोंड्या मारुतीच्या काल कमरेला पाणी लागलेलं होतं. मात्र आता हे पाणी कमी झालं असून गोदाकाठाची मंदिर आता दिसू लागलेली आहे. तरी देखील पावसाचा पुढचा अंदाज बघता नाशिकच्या गंगापूर धरणांमध्ये सकाळी नऊ वाजता 1000 क्युसिक वेगाने पाण्याचा विसर्ग हा केला जाणार आहे, इतरही दारणा पालखेड, नांदूरमध्यमेश्वर या धरणांमध्ये देखील पाण्याचा विसर्ग हा केला जाणार आहे, नाशिक महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

















