Maharashtra Weather Update : पुन्हा पारा वाढणार; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात चार दिवस उष्णतेच्या लाटेचा धोका
Maharashtra Weather Update : पुढचे चार दिवस तापमान 2 ते 3 अंश सेल्सियसनं वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. खान्देश, पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज.
Maharashtra Weather Update : एकीकडे वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा शॉक लागण्याची शक्यता असताना सूर्याचाही प्रकोप झाल्याचं दिसून येत आहे. कारण पुढील चार दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा धोका (Maharashtra Heat Wave) हवामान खात्यानं वर्तवला आहे. सूर्याचा यूव्ही इंडेक्स धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं सूर्याच्या अतीनील किरणांची तीव्रता वाढली असल्याचं हवामान विभागाच्या (India Meteorological Department) वतीनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मार्च महिन्यात सलग दुसऱ्यांदा हे उष्णतेच्या लाटेचं सावट आहे. या आधी 17 ते 19 मार्च या काळात कोकण आणि विदर्भात ही लाट आली होती. आता आजपासून 31 तारखेपर्यंत ही उष्णतेची लाट (Heat Wave) असणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाड्यातल्या काही शहरांचा पारा तर 43 अंशांपार गेला आहे. दुपारच्या वेळेत अतीनील किरणांची तीव्रता अधिक असल्यानं पुढील किमान चार दिवस दुपारच्या उन्हात जाणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
काल (सोमवार) सलग सहाव्या दिवशी अकोल्यात राज्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. आज अकोल्यात कमाल तापमानाचा पारा 42.9 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. 14 मार्चनंतर विदर्भात (Vidarbha) सूर्यनारायण तापला, अकोला आणि चंद्रपुरात सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली. 23 मार्च ते 28 मार्चपर्यंत अकोल्यातील तापमान सर्वाधिक असल्याची भारतीय हवामान खात्याची नोंद करण्यात आली. वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम विदर्भात मागील काही दिवसांत सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात मोठे बदल होणार असून अनेक जिल्ह्यात उष्मघाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
23 मार्च ते 28 मार्चपर्यंत किती तापमानाची नोंद?
- 23 मार्च : 41.6 अशं सेल्सिअस
- 24 मार्च : 42 अशं सेल्सिअस
- 25 मार्च : 42.3 अशं सेल्सिअस
- 26 मार्च : 42.8 अशं सेल्सिअस
- 27 मार्च : 42.3 अशं सेल्सिअस
- 28 मार्च : 42.9 अशं सेल्सिअस
पुढील पाच दिवस महाराष्ट्र तापणार
महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला असून पुढील पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतील तापमान सरासरीच्या 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
29 मार्च रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 30 मार्च रोजी खान्देशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण पश्चिम विदर्भात तापमान सरासरीच्या 4.5 अंश ते 6.4 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 31 मार्च रोजी देखील राज्यात जैसे थे परिस्थिती कायम राहणार आहे. चंद्रपुरात तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Jammu Kashmir Temperature : जम्मू काश्मीरमध्ये तापमान वाढलं, 76 वर्षांचा रेकॉर्ड मोडला