सावधान! राज्यात तापमानाचा पारा 40 अंशावर, 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, दक्षता घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
दिवसेंदिवस राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक भागात तापमान 40 अंशावर गेल्यानं नागरिकांना त्रास होत आहे.
Maharashtra Weather : दिवसेंदिवस राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक भागात तापमान 40 अंशावर गेल्यानं नागरिकांना त्रास होत आहे. अकोल्यात 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हवामान विभागानं काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
अकोला जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्ण लाटेचा इशारा देण्यातच आला आहे. अकोलेकरांना दक्षता घेण्याचे आवाहन नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यात पुढील काळात उष्मालाट उद्भभवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन अकोला जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान अकोल्यात 40.4 अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद झाली आहे.
अकोला जिल्ह्याबरोबर उत्तर कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
अकोल्याच्या तपामानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 5 दिवसांपासून अकोल्यात 40 अंशावर पार तापनामाची नोंद झाली आहे. आणखी पारा वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे अकोल्याचा तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, यंदा तापमान वाढ होणार असून उष्ण वारे आणि उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोणत्या शहरात किती होतं कमाल तापमान ?
(अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई (सांताक्रुज) - ४०
नवी मुंबई - ३९.२
जळगाव - ४०.३
ठाणे - ४१.१
डहाणू - ४०
मालेगाव - ३९
संभाजीनगर - ३७.८
सोलापूर - ३८.३
अकोल्यात मागील काही दिवसांतील तापमान कसं होत?
3 मार्च : 38.6
4 मार्च : 39.3
5 मार्च : 39.5
6 मार्च : 40.7
7 मार्च : 40.8
8 मार्च : 40.9
9 मार्च : 40.4
काय करावे?
तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावे.
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चप्पलाचा वापर करण्यात यावा.
प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी, स्कार्फ, टॉवेल वापर करण्यात यावा.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा.
अशक्तपणा, सुस्तीपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उष्ण लागण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.
विविध शासकीय व खाजगी संस्थांनी कामाच्या ठिकाणी जवळ थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
गर्भवती महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
उष्माघाताचे लक्षण दिसताच तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
काय करु नये?
लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
उन्हाळ्याच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराचे दरवाजे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये, मद्य सेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेऊ नये. त्यामुळं डिहायड्रेशन होते.
उन्हात वाहन शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या






















