Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा कहर! झाडं उन्मळून पडली; तीळ, ज्वारी, केळी, टरबुज, भाजीपाला पिकांचं नुकसान
Maharashtra Weather Report : विदर्भ, मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे.
Weather Update : महाराष्ट्रात मागील 15 दिवसांपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात कुठे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) चांगलंच झोडपून काढलं आहे, तर कुठे उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. आजही विदर्भ, मराठवाड्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर याउलट मुंबई, ठाणेसह कोकणाात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.
अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं नुकसान
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील पार्डी परिसरात रात्री एक वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या तडाख्याने येथील पार्डी युवा शेतकरी विक्की झरकर यांच्या सहा एकर आणि अमोल झरकर यांचे तीन एकर काढणीयोग्य केळी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसेच टरबुज, उन्हाळी तीळ, ज्वारी, भाजीपाला पीकाचे नुकसान झाले आहे व घरावरील टिन पत्रे उडाली आहे.
तीळ, ज्वारी, केळी, टरबुज, भाजीपाला पिकांचं नुकसान
दोन-तीन दिवसापासून दररोज रात्री एक ते तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असल्यामुळे यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी, बाभूळगाव या भागात जवळपास पाचशे हेक्टरवरील उन्हाळी तीळ, ज्वारी, केळी, टरबुज, भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे. तर अनेक भागात झाडे उन्मळून पडली असून वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित झाला असून अद्यापही वीज पुरवठा दुरुस्तीचं काम सुरू आहे.
विदर्भात अवकाळी पावसाचा जोर
विदर्भात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. आता हवामान खात्याने विदर्भात पुन्हा दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे येणाऱ्या हंगामातील कपाशीचं पीक धोक्यात येणार असल्याची चिंता शेतकरी आणि शेती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
वादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली
परभणी शहरासह परिसरामध्ये रात्री जोरदार वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला यामुळे परभणी शहरातील विविध भागांमध्ये जवळपास दहा ते पंधरा मोठे झाडं उन्मळून पडले आहेत शहरातील वसंतराव नाईक पुतळा ते सुपरमार्केट कडे जाणाऱ्या रस्त्यात तीन ते चार झाड म्हणून पडले आहेत तसेच गजानन नगर देशमुख हॉटेल परिसरातही हीच परिस्थिती आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या मार्गावरील वाहतूक अजूनही बंद आहे.