Maharashtra Weather : नाशिक उड्डाणपुलावरुन वाहू लागले धबधबे; बुलढाण्यात नदी नाल्याचे स्वरुप; राज्यात मुसळधारा
Maharashtra Weather : आठवड्यापासून ब्रेक घेतलेल्या पावसाने परत एकदा राज्यासह विदर्भात दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज पावसाने राज्यातील बहुतांश भागात एकच दाणादाण उडवलीय.
Maharashtra Weather : गेल्या दोन आठवड्यापासून ब्रेक घेतलेल्या पावसाने (Rain) परत एकदा राज्यासह विदर्भात दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आज पावसाने राज्यातील बहुतांश भागात एकच दाणादाण उडवली आहे. एकट्या नाशिकमध्ये केवळ अर्ध्या तासाच्या पावसाने शहराला अक्षरक्ष: झोडपून काढल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये (Nashik) आज दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दमदार पावसाने गोदावरीच्या पात्रात गटाराचे पाणी जात होते. तर रस्त्याना नद्यांचे रूप आल्याचे बघायला मिळाले आहे. तर शहरातील उड्डाणपूल अक्षरक्ष: स्विमिंग पुलासरखा भासत होता. याच पुलावरून वाहने जात असताना पुलावरचे पाणी धबधब्यासारखे खालील रस्त्यावर पडत होते. त्यामुळे पुलाला वॉटर कर्टंन लावला आहे का? असाच प्रश्न उपस्थित होत होता.
अशीच काहीशी परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रतील बहुतांश ठिकाणी बघायला मिळाली आहे. तर पुढील 4 तास पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सर्वदूर ढगांची दाटी असून, काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
बुलढाणा तालुक्यातील सैलानी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारनंतर अनेक भागात विजांच्या गडगडटासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. बुलढाणा तालुक्यातील सैलानी, पिंपळगाव सराई, रायपुर, ढसाळवाडी या भागात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सलग एक तास मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकानात, घरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेती पिकांचे देखील नुकसान झाल्याचे कळते आहे. तर जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अनेकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काही भागात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याच पाहायला मिळाले. शनिवारी रात्री झालेल्या मध्यरात्रीच्या मुसळधार पावसानंतर रात्री पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. दरम्यान, या पावसामुळे अकोट तालुक्यातल्या रुईखेड गावात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळं येथील ग्रामस्थांच्या प्रचंड हाल होत आहेत. रुईखेड गावात अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने रात्रभर ग्रामस्थांचे हाल झालेत. आज पहाटे पावसाने विश्रांती घेतलीये, मात्र अक्षरशः गावातल्या रस्त्यावर पावसाच पाणी वाहत असल्याचे बघायला मिळाले. या रस्त्याला जणू नदीचे स्वरूप आल्याचे दिसत होते. तर अनेक शेत शिवारात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल आहे. त्याचा फटका पिकांना बसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा