पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या कोरडे आणि थंड वारे वाहू लागले आहेत.
Maharashtra Weather: राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेला थंडीचा कडाका शनिवार व रविवारनंतर काहीसा कमी होणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवलं आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या कोरडे आणि थंड वारे वाहू लागले असून राजस्थान मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आहे. पूर्वेकडील वाऱ्यांचे वर्चस्व येत्या दोन दिवसात वाढणार असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात येत्या दोन दिवसात 2-3 अंशांनी वाढ होणार आहे. पुण्याचे किमान तापमान रविवारी 12 अंश सेल्सिअसवरून मंगळवारपर्यंत 15 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. काल जळगावमध्ये निचांकी 8.9 अंश तापमानाची नोंद झाली. तर विदर्भात तापमानाचा पारा कमालीचा घसरला होता.
काय दिलाय IMD ने अंदाज?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या लक्षद्वीप आणि त्याला जोडूनच मालदीव परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासात चक्राकार वाऱ्यांची स्थिती बदलणार असून कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होणार आहे. कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात येत्या 4 ते 5 दिवसात ही वाढ होण्याची शक्यता असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. दरम्यान, कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात येत्या दोन दिवसात किमान तापमानात ही दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भातील तापमान फारसे बदलण्याची शक्यता नसल्याचाही हवामान विभागाने सांगितलं.
पुढील पाच दिवस कोरडेच पण...
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असून कमाल व किमान तापमान वाढणार असल्याचं वर्तवण्यात आलंय.
विदर्भात पारा घसरला
विदर्भ वगळता कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या दोन ते तीन दिवसात हळूहळू किमान तापमान वाढणार असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान विदर्भात किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याचं हवामान विभागाने वर्तवला आहे.शुक्रवारी विदर्भातील बहुतांश भागात तापमानात घट झाली होती. कमाल तापमान 27 ते29 अंशांच्या घरात होते. तर किमान तापमानाचा पारा 10 ते 13 अंशांवर स्थिरावला होता. नागपुरात विभागातील सर्वात निचांकी 10.4 अंश तापमानाची नोंद झाली.गोंदियात 10.9 अंश तापमान होते.
मुंबईत गारठा वाढला
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळ मुंबईत तापमान घसरले आहे.सोमवारी मुंबईत महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमानचा पारा होता. सोमवारी 13.7 अंशांवर असलेला तापमानाचा पारा आज वर चढला आहे. पण थंडीचा जोर कमी झाला नाही. पुढील 5 दिवस हे राज्यात थंडीचे असणार आहेत.