Water Level : वेळ पडल्यास पाणी कपातीचा निर्णय, टंचाई भासल्यास गावनिहाय आराखडे तयार : गुलाबराव पाटील
आता जरी पाणीटंचाई जाणवत नसली तरी परिस्थितीनुसार पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल, असं मत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी दिली आहे
Water Level : मागील वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस (Rain) झाल्यानं धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं सध्या फारशी पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र, वाढत जाणाऱ्या कडक पडणाऱ्या उन्हामुळं पाणी पातळीत झपाट्यानं घट होत आहे. त्यामुळ यावर्षी जर वेळेवर पाऊस नाही पडला तर पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता जरी पाणीटंचाई जाणवत नसली तरी परिस्थितीनुसार पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल, असं मत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी व्यक्त केलं आहे.
नियोजन करण्याचे गावनिहाय आराखडे तयार
एल निनोच्या प्रभावामुळं उष्ण तापमान वाढेल, त्याचबरोबर पावसाळाही लांबण्याची अंदाज असल्याने पाणी टंचाईचा सामनाही करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं आतापासूनच पाण्याची बचत करावी लागणार आहे. यंदा राज्यात पाऊस चांगला झाला असल्यानं राज्यातील काही धरणे सोडली तर बहुतांश धरणात पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळं सध्या पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता नाही. मात्र परिस्थिती जशी समोर येईल त्या पद्धतीनं निर्णय घेऊन त्यावर मात करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असे गुलाबराव पाटील म्हणाले. वेळ पडलीच तर पाणी कपातीचा निर्णयही घेतला जाईल असेही ते म्हणाले. सध्या पाणी टंचाईचे सावट असले तरी राज्य सरकार पूर्णपणे त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासाठी नियोजन करण्याचे गावनिहाय आराखडे तयार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यावर पाणी टंचाईचे सावट असल्यानं नागरिकांनी पाणी जपून वापरावं अस आवाहनही पाटील यांनी केलं.
नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार
धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. पावसाळा लांबल्यास पाण्याचं नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे. यासाठी एप्रिल महिन्यात आठवड्यातून एकवेळ पाणी कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल अखेर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करावी की दोन दिवस याचा निर्णय होणार आहे. पाणी कपातीचा आराखडा राज्य सरकारला सादर केला आहे. यावर लवकरच निर्णय होणार आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या 48 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा ऑगस्ट अखेरपर्यंत म्हणणेच पाच महिने पुरवायचे आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात 62 टक्के पाणीसाठा, मुकणे धरणात 59 टक्के, मालेगांवची तहान भागविणाऱ्या गिरणामध्ये 33 टक्के, दारणा धरणात 63 टक्के, पालखेड 58 टक्के पाणीसाठा आहे.
तिलारी धरणातून महालक्ष्मी विद्युत प्रकल्पाला सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याचे आदेश
दरम्यान, तळकोकणातील विजघरमधील महालक्ष्मी विद्युत निर्मिती प्रकल्पाला तिलारी धरणातून सोडण्यात येणारं पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. ही विद्युत निर्मिती कंपनी गेल्या 12 वर्षांपासून वीजनिर्मितीचे काम करत असून विरोधी पक्षनेते अजित पवार याच्या जवळच्या व्यक्तीची कंपनी आहे. तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्यावर विजघर येथे महालक्ष्मी विद्युत निर्मिती प्रकल्प 2010 मध्ये आघाडी सरकारच्या काळात उभारण्यात आला आहे. मात्र विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी तिलारी धरणातून किती पाणी घ्यायचे याची कोणतीही नोंद पाटबंधारे विभागाकडे नाही. कंपनीशी झालेल्या करारातही नमूद करण्यात आले नाही. विशेष म्हणजे या प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या विजेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणताही फायदा नाही.
तिलारी पाटबंधारे प्रकल्प हा 16 टीएमसीचा असून सध्या या धरण क्षेत्रात 54 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अधीक्षक अभियंता विजय थोरात यांना विजघर विद्युत निर्मिती प्रकल्पाचे पाणी तत्काळ बंद करा. पाच कोटीची वीज आणि पन्नास कोटीचे पाणी कसे शक्य आहे. याचा फायदा कोणाला या सगळ्याची चौकशी लावण्याचे सांगत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी त्यांचा रोख कंपनीवर कमी आणि राजकीय विरोधकांवर जास्त होता. त्यातच ही कंपनी विरोधी पक्षनेते अजित पवार याच्या जवळच्या व्यक्तीची असल्याने दीपक केसरकर यांना आयती संधी आल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: