Abdul Sattar : ती जमीन आमचीच, अब्दुल सत्तारांनी वाटप केलेली जमीन नियमबाह्य नाही; खंदारे कुटुंबियाचा दावा
Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वाटप केलेली जमीन नियमबाह्य नसून, ती जमीन आमचीच असल्याचा दावा खंदारे कुटुंबियांनी केला आहे.
Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वाटप केलेली जमीन नियमबाह्य नसून, ती जमीन आमचीच असल्याचा दावा खंदारे कुटुंबियांनी केला आहे. सत्तार यांनी ठाकरे सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना वाशिम (Washim) जिल्ह्यातील घोडबाभूळ शिवारातील 37 एकर जमीन योगेश खंडारे यांच्या नावे करण्याचा आदेश दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र,ही जमीन खंदारेंच्या आजोबांना स्वातंत्र्याच्या आधी ब्रिटिशांनी बक्षीस स्वरूपात दिली होती अशी माहिती खंदीरे कुटुंबियांनी दिली आहे.
1944 ते 1946 च्या दरम्यान ही जमीन बक्षीस स्वरूपात देण्यात आली होती
शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री असणारे अब्दुल सत्तार हे ठाकरे सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी दिलेला निर्णय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. योगेश खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे आजोबा वामन खंदारे हे ब्रिटिश राजवटीत तहसीलमध्ये महसूल खजिनदार होते. त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या मोबदल्यात त्यांना 1944 ते 1946 च्या दरम्यान ही जमीन बक्षीस स्वरूपात देण्यात आली होती. त्याचे सर्व दस्तावेज खंदारे कुटुंबीयांकडे असल्याचा त्यांचा दावा योगेश खंदारे यांनी केला आहे.
या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला नाही
गेल्या अनेक वर्षापासून योगेश खंदारे यांचे वडील रमेश खंदारे हे जमीन आपली असल्याचं सांगत आहेत. त्या संदर्भातील पत्रकही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. शिवाय अमरावती आयुक्तालयाने जमीन नियमाकुल करण्यासाठी त्यांना दंड भरण्याचे जुने आदेशही दिले होते. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने तेव्हा तो भरला नाही. त्या आदेशाची प्रत त्यांच्याकडे उपलब्ध आहे. सर्व प्रकरणी खंदारे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे गेले होते. यावेळी सत्तारांनी या प्रकरणात जमीन योगेश खंदारे यांच्या नावावर करण्याचे आदेश वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या संदर्भात बोलताना, अब्दुल सत्तार यांनी आम्हाला न्याय दिला. यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला नाही. तो करण्याची आमची परिस्थितीही नाही अशी प्रतिक्रिया योगेशच्या खंदारे यांच्या आईने दिली आहे.
सत्तारांचे विधानसभेत निवेदन
दरम्यान, गायरान जमीन प्रकरणावरुन विरोधकांनी अब्दुल सत्तारांना चांगलेच धारेवर धरले आहे. या प्रकरणी सत्तारांनी काल सभागृहात विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. नियमानुसारच गायरान जमिनीचे वाटप केल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली. या प्रकरणात उच्च न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य असेल असेही सत्तार यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: