Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती.
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी (Rajan Salvi) हे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार की भाजपमध्ये जाणार? याबाबत चर्चांना उधाण आले होते. तर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राजन साळवी जर आमच्या पक्षात आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे वक्तव्य केले होते. आता यावर खुद्द राजन साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राजन साळवी म्हणाले की, पराभवाच्या वेदना आहेत. मला तुमच्याकडून कळतंय की मी नाराज आहे. मात्र या सर्व अफवा आहेत. मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहेत. पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, तशा प्रकारचा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असेल. पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचे कर्तव्य असते. त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. मी मतदार संघात काम करत आहे. मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलेन, मी भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येकाचे वैयक्तिक मत असेल
खासदार नरेश मस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले आमदार आणि पराभूत झालेले उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येण्याबाबत इच्छुक आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येकाचे वैयक्तिक मत असेल. माझं मत आणि माझ्या भावना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. माझ्या मतदारसंघातील जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत, असे राजन साळवी यांनी म्हटले.
पराभवानंतर उद्धव ठाकरेंसोबत बैठक
परभवानंतर वरिष्ठांनी तुमच्याशी कोणी संपर्क साधला का? असे विचारले असता ते म्हणाले की, पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत कशा पद्धतीने पराभव झाला? त्याचे कारण काय? याबाबत आत्मचिंतन करण्यात आले. त्या दृष्टीने योग्य त्या सूचना आम्हाला देण्यात आलेल्या असल्याची माहिती राजन साळवी यांनी दिली.
आमच्यावर एसीबीची टांगती तलवार
यापूर्वी एसीबीचा ससेमिरा तुमच्या मागे लागलेला होता. आता विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत. पुन्हा एकदा एसीबीच्या माध्यमातून तुमची चौकशी होऊ शकते. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, माझी आणि माझ्या कुटुंबियांची एसीबीकडून चौकशी सुरू होती. त्याबाबतीत आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय आता अपेक्षित आहे. परंतु आमच्यावर एसीबीची टांगती तलवार आहे, असेही राज साळवी यांनी सांगितले.
आणखी वाचा