Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
Beed crime: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार आहेत. यावरुन पोलीस यंत्रणा टीकेची धनी ठरत आहे. एसआयटी प्रमुख आज बीडमध्ये जाऊन तपासाची सूत्रे हाती घेणार
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये ठाण मांडून हत्याप्रकरणातील आरोपींची चौकशी करत आहेत. या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणारे वाल्मिक कराड यांनादेखील बीड शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. सध्या सीआयडीचे अधिकारी कराड यांची कसून चौकशी करत आहेत. अशातच आता या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख डॉ. बसवराज तेली आज बीडमध्ये येऊन तपासाचा चार्ज घेतील.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी 10 जणांचे एसआयटी पथक बुधवारी गठित झाले. या पथकाचे नेतृत्त्व पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे देण्यात आले होते. ते आज बीड पोलीस ठाण्यात येऊन या संपूर्ण घटनेची माहिती घेणार आहेत. यानंतर ते संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या केज परिसरात जाऊन पाहणी करणार आहेत. याप्रकरणातील 3 मारेकरी अद्याप फरार आहे. तर वाल्मिक कराड यांच्यावर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांच्याविरोधात कलम 302 लावावे, अशी मागणी केली जात आहे. त्यादृष्टीने एसआयटी आणि सीआयडीचा तपास महत्त्वाचा मानला जात आहे.
बीड पोलीस ठाण्यात आणलेले ते पलंग कुठे?
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी रात्री ट्विट करत बीड शहर पोलीस ठाण्यात अचानक 5 पलंग आणण्यात आल्याचे ट्विट केले होते. यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहेत. वाल्मिक कराड याच ठिकाणी असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये वाल्मीक कराड यांना ठेवण्यात आले आहे या ठिकाणी अर्थात बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे. काल बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी येथे पाच पलंग आणि बेड आणण्यात आले होते. मात्र यावर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून आत्ताच बेड कसे मागवले गेले असा प्रश्न उपस्थित केला होता. यासोबतच रोहित पवार यांनी या पोलीस स्टेशनमध्ये आता एसी सुद्धा बसून घ्या, असा खोचक टोला लगावला होता. दरम्यान, वाल्मिक कराड यांची प्रकृती बुधवारी रात्री पुन्हा एकदा बिघडली होती. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन मास्क लावावा लागला होता.
वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, सगळंच बाहेर येईल: सचिन खरात
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे राज्याच्या प्रत्येक घरात एकच चर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. बीड मधील नेते म्हणत आहेत बीडची परिस्थिती बिहार सारखी झालेली आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो बीडची परिस्थिती गुंडांनी अफगाणिस्तानसारखी केलेली आहे. परंतु सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मीक कराड यांच्यावर दोन तीन दिवसांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. यानंतर वाल्मीक कराड हा फरार झाला, मग खरंच वाल्मीक कराड निर्दोष होता तर तो फरार का झाला? त्यानंतर हाच वाल्मीक कराड स्वतः सरेंडर सीआयडी ऑफिसला पुण्यात झाला. या सगळ्या बाबी संशयास्पद आहेत. त्यामुळे या वाल्मीक कराडची तात्काळ नार्को टेस्ट करा, मग सगळंच बाहेर येईल, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी म्हटले.
आणखी वाचा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा