(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Vidhan Sabha Election : असंगाशी संग, 'उलटी'वरुन राजकीय मळमळ सुरु असतानाच महायुतीचा इतक्या जागांवर 'फाॅर्म्युला' ठरला!
या बैठकीत भाजपला जास्तीत जास्त जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा मिळतील. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा देण्याचे मान्य झाले, याची माहिती समोर आलेली नाही.
Maharashtra Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दुसरी फेरी काल (31 ऑगस्ट) पार पडली. राष्ट्रवादीच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार 3 तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील 288 पैकी 173 जागांवर एकमत झालं आहे. या बैठकीत भाजपला जास्तीत जास्त जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा मिळतील. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा देण्याचे मान्य झाले, याची माहिती समोर आलेली नाही. पुढील बैठकीत उर्वरित 115 जागांवर निर्णय होणार आहे.
जागावाटप निश्चित करण्यासाठी आणखी दोन तीन बैठकांच्या फेऱ्या
जागावाटप निश्चित करण्यासाठी आणखी 2-3 बैठकांच्या फेऱ्या होतील. नागपुरात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार सभेपूर्वी नागपुरात म्हणाले होते की, 2019 च्या निवडणुकीत आम्ही 54 जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम्हाला काँग्रेसचे तीन आमदार आणि तीन अपक्षांचा पाठिंबा असल्याने आमची ताकद वाढत आहे. या विधानसभा निवडणुकीत आम्ही 60 जागांची मागणी करणार आहोत. महायुती सरकारचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 मध्ये संपणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये निवडणुका होऊ शकतात. 2019 मध्ये 105 आमदारांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
महायुतीत जागा वाटपावरुन रस्सीखेच?
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवार यांचा युवकांच्या मेळाव्यात उल्लेख केला आहे. काँग्रेसचे हिरामण खोसकर, झिशान सिद्धकी आणि सुलभा खोडके लवकरच आपल्या सोबत येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. यासोबतच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्या सोबत असल्याचा उल्लेख अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार गट 60 जागा मिळवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या