(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasai : पालकांनो, रस्त्यावर मुलांना एकटं सोडू नका, वसईत स्कूल बसने दोन मुलींना चिरडलं, CCTV मध्ये थरार कैद
Vasai : पालकांनो मुलांना एकटं सोडू नका, वसईत स्कुल बसने दोन मुलींना चिरडल्याची घटना घडली आहे. घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Vasai Accident : पालकांनो, आपल्या लहान मुलांना रस्त्यावर कुठेही एकटं सोडू नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा, कारण वसईतील नायगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका स्कूल बसने दोन मुलींना चिरडल्याची घटना घडली आहे. घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
लहानग्या दोन्ही मुली बसच्या समोरील चाकाखाली आल्या
नायगाव मधील अमोल नगर परिसरात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन लहान मुली रस्ता ओलांडत होत्या. त्या दरम्यान वसईच्या सेंट अगस्टिन स्कुल बसने समोरून येऊन मुलींना उडवलं आहे. लहानग्या दोन्ही मुली बसच्या समोरील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना वसई पश्चिमेच्या कार्डिनल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून यात पाच वर्षच्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महिरा अन्सारी वय 5 वर्ष आणि गुलशन अन्सारी वय 2 अशी मुलींची नावे आहेत.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन
वसई पोलिसांच्या माहितीनुसार, बस ड्रायव्हरला समोरच्या मुलींचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितली आहे. जर आपण सीसीटीव्ही दृश्यात पाहीलं तर अपघात इतका भीषण होता की बसचं समोरील चाक चक्क मुलींच्या अंगावरून गेलं आहे. दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांना रस्त्यावर एकट सोडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना
वसईतील ही काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना पाहताच अनेकांना धडकी भरली आहे. सीसीटिव्ही दृश्यात दिसत असल्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून दोन्ही बहिणी एकमेकांचे हात धरून रस्ता ओलांडत होत्या. तेव्हा वसई पश्चिम मधील सेंट अगस्टीन शाळेची बस मुलांना शाळेतून त्यांच्या घरी सोडायला जात होती. रस्त्यावर वळण असल्याने बसचालकाला चिमुकल्या मुली दिसल्या नाहीत. आणि काही समजण्याच्या आतच स्कूल बसने पायी जात असलेल्या दोन्ही चिमुकल्यांना धडक दिली. या धडकेत दोन्ही बहिणी बसच्या चाकाखाली आल्या. हा थरार पाहताच परिसरातील लोकांनी आरडाओरड केली, आणि चालकाच्या लक्षात येताच त्याने तत्काळ बस थांबवली. स्थानिकांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलींना बस खालून काढले, आणि क्षणाचाही विलंब न करता त्या दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दोन्ही मुलींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू, एका मुलीची प्रकृती चिंताजनक
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दोन्ही मुलींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून यातील 2 वर्षाच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
हेही वाचा>>>
Vasai : तब्बल अडीच तास ट्राफिक, रुग्णवाहिकेत तान्हुल बाळ, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी आणखी किती अंत पाहणार?