Vasai : तब्बल अडीच तास ट्राफिक, रुग्णवाहिकेत तान्हुल बाळ, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी आणखी किती अंत पाहणार?
Vasai : अडीच तासाच्या वर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने बाळाचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले होते.
Vasai : वसई हद्दीतील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad Highway) वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतोय. वाहतुक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही करावा लागतोय. आज यांच महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारी एक रुग्णवाहीका सुमारे अडीच तास अडकली होती. या रुग्णवाहिकेत एक तान्हुले बाळ होते.
तीन दिवसांच्या बाळाला वाचविण्यासाठी आईवडिलांची तळमळ
फक्त तीन दिवसांपूर्वी जुळ्या बाळांचा जन्म झाला. त्यातील एका बाळाचा रुग्णालयात मृत्यू झाला तर दुसऱ्या बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईला घेऊन जात होते. मात्र अडीच तासाच्या वर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने बाळाचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले होते. तब्बल अडीच तासाच्या वाहतूक कोंडीनंतर सकाळी आठच्या सुमारास ही रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतून बाहेर निघाली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
मदतीसाठी कुणीच नाही, बाळाची प्रकृती गंभीर
याबाबत माहिती अशी की, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दोन्ही लेनवर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळे तब्बल दोन ते अडीच तास एका रुग्णवाहिकेला बाहेर जाण्यासाठी मार्गच सापडत नव्हता. अडीच तास रुग्णवाहिका एकाच ठिकाणी अडकून पडली होती. रस्त्याचे काम सुरू असताना महामार्गासंबंधी प्रशासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी किंवा रोडचे काम करणाऱ्या ठेकेदारांपैकी कुणीही वाहतूक नियोजनासाठी तसेच मदतीसाठी नव्हतं. एकतर आधीच या दोन बाळांपैकी एका बाळाचा जीव गेला होता, आता एका बाळाचा तरी जीव वाचावा यासाठी बाळाच्या नातेवाईकांची धडपड सुरू होती, दुसऱ्या बाळाची प्रकृती गंभीर असून त्याला तातडीने उपचाराची गरज होती.
वाहनचालकांमध्ये तीव्र संताप
वसई हद्दीतील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट काँक्रीटचे काम चालू असल्याने पेल्हार, वसई फाटा, सातीवली चढण, चिंचोटी, ते सनई ढाबापर्यंत वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळतंय. गुजरात आणि मुंबईला जाणाऱ्या दोन्ही लेनवर ही वाहतूक कोंडी झाल्याने रुग्णवाहिकेला सुद्धा जाण्यासाठी मार्ग राहत नाही. अशात महामार्गाचे आणि शहराचे वाहतुक पोलीस, प्रशासनाचा अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर नसल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अजून किती अंत पाहणार?
वसई हद्दीतील या महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा संताप होतोय, तसेच हा राष्ट्रीय महामार्ग असून नियोजनासाठी कोणीच नसल्याने अजून किती अंत पाहणार असा सवाल वाहनचालकांकडून करण्यात येतोय
हेही वाचा>>>