(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अवकाळी पाऊस मुळावर, पंढरपुरात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसणार 100 कोटींचा फटका
कोरोना संकटामध्येच आलेलं वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून अडचणीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावासाचा सामना करावा लागला.
Solapur Pandharpur Latest News : मागील दोन वर्षांपासून आलेल्या कोरोना महमारीमुळे अर्थव्यवस्था कोसळली आहे. कोरोना संकटामध्येच आलेलं वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून अडचणीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावासाचा सामना करावा लागला. पुन्हा अवकाळी पावसाने दणका दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंढरपूर परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना जवळपास 100 कोटींचा फटका बसणार आहे .
सध्या द्राक्षांची तोडणी सुरु असून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून द्राक्ष बागांचे करार करून तोडणी सुरु केली होती. शुक्रवारी पहाटेपासून पंढरपूर तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या हजेरीने या द्राक्ष बागायदारांचे धाबे दणाणले. द्राक्ष घडात पाणी गेल्याने आता व्यापाऱ्यांनी तोडणीला आणलेल्या गाड्या परत फिरवल्या आहेत. यापेक्षा मोठे नुकसान बेदाणा करणाऱ्या शेतकऱ्यांचे झाले असून हा बेदाणा भिजल्याने त्याच्या किमती झपाट्याने निम्म्यापेक्षा कमी होणार आहेत. पंढरपूर तालुक्यात जवळपास 18 ते 20 हजार एकरावर द्राक्ष बागा आहेत. यातील जवळपास पाच हजार एकरावरील बागातून बेदाणा बनविण्याचा व्यवसाय होत असतो . एकंदर पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दर वर्षी 500 कोटी रुपयांची उलाढाल करीत असतात .
सध्या जवळपास पाच हजार टना पेक्षा जास्त बेदाणा शेडमध्ये होता. यातच पहाटे पाऊस सुरु झाल्याने उभारलेल्या तात्पुरत्या शेडमधून पावसाचे पाणी रॅकवर असणाऱ्या बेदाण्यावर पडल्याने याचे मोठे नुकसान होणार आहे . सध्या पंढरपूर बाजारात सरासरी 250 रुपये किलोने बेदाण्याची विक्री होत असून आता पावसात भिजलेल्या या बेदाण्याची रंग काळपट होणार असल्याने दर निम्म्यापेक्षा जास्त कमी होणार आहेत. तसे हवामान खात्याने अवकाळीचा अंदाज दिलेला होता मात्र पहाटे अचानक पावसाच्या सारी पडू लागल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरु झाली. द्राक्ष बागांवर या पावसाने कीड पडणार असल्याने आता किमान 3 फवारण्याचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. अवकाळी झाल्याने लगेचच व्यापाऱ्यांनी द्राक्ष आणि बेदाण्याचे दर कमी करण्यास सुरुवात केल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी सांगितले .