Shiv Sena Party Office : विधीमंडळ कार्यालयपाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे
Shiv Sena Party Office : संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: विधानभवनातील शिवसेना (Shiv Sena) पक्ष कार्यालयानंतर आता संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्यात आलं आहे. शिंदेगटाचे नेते राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) नाट्यमय घडामोडीनंतर संसदेतील हे कार्यालय शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वापरण्यात येत आहे. वादादरम्यान देखील दोन्ही गट या एकाच पक्ष कार्यालयात बसत होते. पण आता ही मालकी पूर्णपण लोकसभा सचिवालयाने (Loksabha) शिवसेना शिंदे गटाला दिली आहे. जो प्रकार काल विधानसभेच्या (Vidhansabha) पक्ष कार्यालयात होताना दिसला तोच प्रकार आज संसदेच्या बाबतीत देखील होताना दिसत आहे. संसदेतील शिवसेनेचे कार्यालय हे शिंदे गटाला देण्यात आले आहे.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) असे दोन गट पाहायला मिळाले. दोन्ही गटांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. तसेच, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. तिथून पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि तिथून या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. अशातच शुक्रवारी (17 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षातला (Maharashtra Political Crisis) उद्धन ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
आम्ही शिवसेना त्यामुळेच विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले : एकनाथ शिंदे
शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटाला निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर आता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) आणि पक्षाच्या मालमत्तेबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतल्यानंतर या चर्चा आणखीच जोर पकडू लागल्या होत्या. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवन आणि इतर मालमत्तांबाबत महत्त्वांचे वक्तव्य केले आहे. आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळेच आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र आम्हाला कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही. आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :