Maharashtra Rain Live Updates : राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट
Maharashtra Rain Live Updates : राज्यात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यासह, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरुच आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरु आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटांच्या पुढे गेली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 74 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 7 राज्य मार्गांवर पाणी आलं आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख 24 मार्ग पाणी आल्याने बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 31 मार्गांवर थेट संपर्क तुटल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. 7 राज्यमार्गांवर 12 ठिकाणी पाण्याने वेढा दिला आहे. प्रमुख 24 मार्गावर 26 ठिकाणी पाण्याचा विळखा आहे.
पुणे पाऊस
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात संसतधार पाऊस सुरु आहे. दोन दिवस पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यासोबतच लोणावळ्यात (Lonavala) वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. नदी, नाले, धबधबे वाहू लागलेत, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. मात्र गेल्या 24 तासात दमदार पाऊस झाल्याने पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. धबधबे देखील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी लोणावळ्यात अधिक पाऊस पडला आहे.
विदर्भातही पावसाची हजेरी. विदर्भातही जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत तर भंडाऱ्यात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Nashik Rain : नाशिक शहर परिसरात पावसाची उघडीप, सूर्यदर्शनही झाले!
Nashik Rain : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरात सुरु असलेली संततधार अखेर थांबली असून आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सकाळपासून आल्हाददायक वातावरण असून हवेत गारवा जाणवत आहे. त्याचबरोबर सूर्यदर्शनही झाल्याने नागरिक घराबहेर पडत आहेत. तर दुसरीकडे पावसाने उघडीप दिल्याने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, सावरकुटे येथील जोगेश्वरी विद्यालयाची इमारत भुईसपाट
Ahmednagar Rain : अकोले तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावर सर्वदूर पावसाचे तांडव सुरु आहे. वादळी पावसामुळं दुर्गम आदिवासी भागातील सावरकुटे येथील जोगेश्वरी विद्यालयाची इमारत रात्री भुईसपाट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला आहे. हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढत असून पावसाचा हाहाकार माजला आहे . रात्री झालेल्या पावसाने जोगेश्वरी विद्यालय, सावरकुटे अक्षरशः भुईसपाट केले. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने जीवितहानी टळली. मागील वर्षी संस्थेच्या व गावकऱ्यांच्या मदतीने आठवी, नववी व दहावीच्या वर्गासाठी वर्गखोल्या उभारल्या होत्या. सगळं अगदी व्यवस्थितपणे चालू होते. आठवी , नववी , दहावीचे विद्यार्थी भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत होते. पण वादळी पावसामुळं रात्रीच्या वेळेस शाळेची इमारत पूर्ण पडली आहे.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सांगली शहरातील काही कुटुंबांचे स्थलांतर
Sangli Rain : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पातळी 30 फुटांवर गेली आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर सांगली शहराच्या सूर्यवंशी आणि आरवाडे प्लॉट या पूर पट्ट्यामधील सहा कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. सूर्यवंशी प्लॉट मधील दोन घरात पाणी घुसले आहे. आणखीन पाण्याची पातळी वाढली तर सांगलीच्या विस्तारित भागात पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरपट्ट्यातील नागरिकांनी स्वतः हुन सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे, असे आवाहन महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी जनतेला केले आहे. पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धोका पत्करु नये असे आवाहन केले आहे.
भोर तालुक्यातील भाटघर धरणातून साडेसात हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु
Pune Rain : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणातून साडेसात हजार क्युसेक इतक्या वेगाने निरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. भाटघर धरण हे ब्रिटिशकालीन धरण असून या धरणाला 85 स्वयंचलित दरवाजे आहेत. त्यापैकी 12 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
उजनी आणि वीर धरणातून विसर्ग, पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटातील मंदिरात शिरलं पाणी
उजनी आणि वीर धरण (Ujani Veer Dam) 100 टक्के भरल्याने भीमा आणि नीरा नदीत (Chandrabhaga Neera River) मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून वाळवंटातील मंदिरात पाणी शिरू लागल्याने येथील देवांच्या मूर्ती हलविण्यास सुरुवात झाली आहे. सध्या लागून आलेल्या सुट्ट्या आणि पवित्र श्रावण महिना सुरु असल्याने रोज हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत आहेत.