Maharashtra Politics : ठाकरेंच्या शिवसेनेची खरंच अडीच लाख शपथपत्रं बाद झाली का?
Maharashtra Politics : रविवारी ठाकरे गटानं आयोगात साडेआठ लाख कागदपत्रं सादर केल्याची बातमी आली आणि अवघ्या दोनच दिवसांत अडीच लाख शपथपत्रं बाद झाल्याच्या एका तथाकथित बातमीवरुन गदारोळ उडाला.
Maharashtra Politics : रविवारी ठाकरे गटानं आयोगात साडेआठ लाख कागदपत्रं सादर केल्याची बातमी आली आणि अवघ्या दोनच दिवसांत अडीच लाख शपथपत्रं बाद झाल्याच्या एका तथाकथित बातमीवरुन गदारोळ उडाला. पण एबीपी माझाशी बोलताना निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी याबाबत नेमकं सत्य काय आहे, यावर प्रकाश टाकलाय. पाहुयात त्याबद्दलचा रिपोर्ट.
निवडणूक आयोगात ठाकरे गटाच्या शपथपत्रांबाबत नेमकं वास्तव काय. खरंच अडीच लाख शपथपत्रं बाद झाली का? या सगळ्या उलटसुलट चर्चा सुरु असतानाच निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत महत्वाचं विधान केलं आहे. कागदपत्रं बाद करण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही. ही कागदपत्रं आयोगाला मिळाली असून ती तपासण्याचं काम तूर्तास सुरु आहे, अशी माहिती आयोगाच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
रविवारी अगदी दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून साडेआठ लाख कागदपत्रं आयोगाला सादर झालीत. ही कागदपत्रं म्हणजे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज असल्याची माहिती आहे. याआधी 50 हजार पदाधिकाऱ्यांची शपथपत्रंही सादर केल्याचं सांगितलं जातंय. पण अवघ्या दोन दिवसांतच आणि तेही निवडणूक आयोगाला सुट्टी असताना इतक्या मोठ्या संख्येनं अर्ज बाद कसे झाले हा प्रश्नच होता. आयोगानं धनुष्यबाण तर गोठवला आहे, पण हा निर्णय तात्पुरता आहे. कागदपत्रं तपासून आयोगाला अंतिम निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठीच दोन्ही बाजूंनी कागदपत्रांची ही लढाई सुरु आहे. ठाकरे गटासोबतच शिंदे गटानंही कागदपत्रं आयोगाला सादर केली आहेत. दोन्ही बाजूंनी लाखांचे दावे केलेत.
एकीकडे आयोगात ही कागदपत्रांची लढाई सुरु आहे, तर दुसरीकडे त्याआधीच ठाकरे गटाची शपथपत्रं बोगस असल्याच्या आरोपावरुन काही ठिकाणी गुन्हेही दाखल झालेत. त्यामुळे भविष्यात या कागदपत्रांच्या तपासणीत याही मुद्द्याचा उल्लेख होतोय का पाहावं लागेल. निवडणूक आयोगातल्या लढाईत या कागदपत्रांचा किती उपयोग होणार हा पुढचा प्रश्न. पण तूर्तास त्यावरुन दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरु आहे. शपथपत्र बाद झाली तर त्याचं काहीतरी ऑफशियल कन्फर्मेशन आयोग स्वत;च संबंधित पक्षकारांना कळवत असतंच. पण त्याआधी एका न झालेल्या गोष्टीवरुन प्रतिक्रियांचा धुरळा मात्र जोरदार उडाला.
पक्ष आणि चिन्हासाठीची लढाई आयोगासमोर सुरु
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निवडणूक निशाणी काही काळासाठी गोठवली आहे. मात्र, पक्ष आणि चिन्हासाठीची लढाई अद्याप आयोगासमोर सुरु आहे. या लढ्याच्या अंतिम निकालानंतरच शिवसेना कुणाची याचा फैसला होणार आहे.