(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena: ठाकरे-शिंदे गटाच्या वादात धनुष्यबाण गोठलं; आता 'या' नावावर दोन्ही गटाचा दावा
Maharashtra Politics Shivsena: ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादात शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने गोठवले. त्यानंतर आता दोन्ही गटांकडून एकाच नावावर दावा करण्यात आला आहे.
Maharashtra Politics Shivsena: शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाने (Shinde Group) पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Bow And Arrow) आणि पक्षावरच दावा केला. निवडणूक आयोगाने (Election Commission) शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवताना शिवसेना (Shivsena) नाव वापरण्यासही मनाई केली. निवडणूक आयोगाने पर्यायी नाव वापरण्याची सूचना केल्यानंतर आता दोन्ही गटांकडून एकच नाव समोर आले आहे. निवडणूक चिन्हा पाठोपाठ आता पक्षाच्या नावावरही दोन्ही गटांनी दावा केला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाने आपल्या गटांना 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने शिवसेनेवर दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. शिंदे गटाने आपल्याकडे 40 आमदार आणि 12 खासदारांचे पाठबळ असल्याचे निवडणूक आयोगाला सांगितले. त्याशिवाय, पक्षाचे काही पदाधिकारीदेखील सोबत असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. तर, दुसरीकडे पक्षाची कार्यकारणी, संघटनात्मक ताकद आपल्या पाठिशी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता. पक्षाची घटना सर्वोच्च असून त्यानुसार, निवडण्यात आलेली कार्यकारणी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे ठाकरे गटाने म्हटले होते. निवडणूक आयोगाने शनिवारी दोन्ही बाजूने करण्यात दावे, सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय, शिवसेना हे नाव देखील वापरण्यास मनाई केली. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा आदेश दिला.
आता नावही गोठणार?
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई करण्यात आली. मात्र, शिवसेना या नावाच्या पुढे उपनाम जोडता येणार आहे. त्यानुसार शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाने आता आपल्या गटासाठी एकच नाव सुचवले आहे. दोन्ही गटांनी 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' या नावाची मागणी केली आहे. आता, दोन्ही गटाने मागणी केल्याने निवडणूक आयोगाकडून हे नावदेखील गोठवण्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना सोमवारी, 10 ऑक्टोबर रोजी, दुपारपर्यंत उपलब्ध असलेले निवडणूक चिन्ह निवडण्यास सांगितले आहे.
चिन्ह कसं दिलं जातं ?
निवडणूक आयोगाकडे चिन्हांची एक यादी तयार असते. त्याच्याकडे विविध चिन्ह तयार असतात. आता धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं आहे. याबाबत दोन्ही गटाला कळवलं देखील गेलं आहे आणि नव्या चिन्हासाठी 10 तारखेपर्यंत निर्णय होणार आहे. निवडणूक आयोगाकडे असलेली चिन्ह ही दोन्ही गटांसाठी आधी उपलब्ध असतील. जर निवडणूक आयोगाकडे असलेली चिन्ह जर दोन्ही गटाला नको असतील तर त्यांच्याकडून आयोगाकडे विनंती केली जाईल. त्यामध्ये शिंदे आणि ठाकरे गट आपल्याला हव्या असलेल्या चिन्हासाठी मागणी करतील त्यावर आयोग निर्णय घेईल.