Shiv Sena Symbol : सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे.केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Group : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. दरम्यान हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याची माहिती आहे. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
Shiv Sena's 'Bow & Arrow' symbol claim | Election Commission of India passes interim order, says in Andheri East bye polls neither of the two groups shall be permitted to use the symbol "Bow & Arrow", reserved for "Shivsena". pic.twitter.com/QtC9iNhZ0X
— ANI (@ANI) October 8, 2022
ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, आम्हाला याचं मोठं दु:ख झालं आहे. हा निर्णय धक्कादायक आहे. शिवसैनिकांसाठी हे फारच क्लेषदायक आहे. मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी हे धोकादायक आहे. गद्दारांचं हे पाप कधीही धुतलं जाणार नाही. बाळासाहेबांनी कष्टाने उभा केलेल्या शिवसेनेची अवस्था ही गद्दारांनी केली आहे, असं खैरे म्हणाले.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, आता या अंतरीम निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात अपील करु शकतील मात्र आता तेवढा वेळ नाही. कारण अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याची मुदत 13 तारखेचा आहे. त्यामुळं त्याआधी त्या आदेशाला स्थगिती मिळवावी लागेल. सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयाला स्थगिती दिली तरच शिवसेनेला हे चिन्ह मिळू शकेल, असं देशपांडे म्हणाले.
ठाकरे गटानं प्रभावीपणे केला होता दावा..
तत्पूर्वी ठाकरे गटानं आज त्यांच्याकडील महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगात सादर केली होती. शिवाय अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागतायत असा सवाल ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला होता. शिवाय शिंदेंनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही असं ठाकरे गटानं म्हटलं होतं. आमच्याकडे राजधानी दिल्लीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक शपथ पत्र तयार आहेत. अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत. फक्त विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा. जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील तर ती पण आम्ही सादर करू, असा दावा उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर केला होता.