Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांना पोलिसांचा मोठा दिलासा, सुषमा अंधारेंच्या तक्रारप्रकरणी मिळाली 'क्लीन चीट'
Sanjay Shirsat Clean Cheat: डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर शिरसाट यांना हा क्लीन चीट मिळाला आहे.
Sanjay Shirsat Clean Cheat: शिवसेनेचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या विरुद्ध विनयभंग करणारे वक्तव्य केल्या प्रकरणाच्या आरोपाबाबत शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आला आहे. डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर शिरसाट यांना हा क्लीन चीट मिळाला आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषणा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगासह परळी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हे वक्तव्य करण्यात आल्याने बीड पोलिसांनी ही तक्रार छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडे वर्ग केली होती. त्यानंतर डीसीपी दर्जाच्या एका अधिकाऱ्याकडून या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. मात्र संजय शिरसाट यांनी जेव्हा वक्तव्य केलं त्यावेळी अंधारे या त्या ठिकाणी नव्हत्या. घटनास्थळी व्यक्ती नसल्याने विनयभंग होत नसल्याचा निकष पोलिसांकडून काढण्यात आला आहे. त्या प्रकरणी अंधारे यांना पत्र पाठवून पोलिसांकडून कळवण्यात देखील आले आहे.
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून सुरु होता तपास
सुषमा अंधारे यांच्यावर भाषणामध्ये अपशब्द वापरल्याच्या प्रकरणील छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून तपास सुरु होता. यासाठी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यासह उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या महिला अधिकाऱ्यांची तपासासाठी नेमणूक करण्यात आली होती. तसेच यूट्यूबवर उपलब्ध असलेलं संजय शिरसाट यांचं भाषण तपासण्यात आले होते. तसेच तक्रारीमध्ये पुरवलेल्या भाषणाचीही तपासणी करण्यात आली. तर 'लफडं' हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसतो का याचीही चौकशी करण्यात आली. तर विनयभंग करण्यात आल्याच्या आरोपाची देखील चौकशी करण्यात आली.
शिरसाट यांची प्रतिक्रिया...
दरम्यान यावर आमदार संजय शिरसाट यांनी 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया दिली आहे. “मी असले कोणतेही वक्तव्य केले नव्हते. पण एखाद्या गोष्टीचे बाऊ करणे आणि बदनाम करण्याचा हा प्रकार होता. अंधारे कोर्टात देखील गेल्या होत्या आणि त्यांना न्यायालयाने देखील फटकारले आहे. त्यामुळे एखाद्या माणसाला टार्गेट करून स्वतः प्रसिद्धीत येण्याच्या घटनांना आळा बसणार आहे. मी न्यायालयात गेलो नव्हतो, ते गेले होते. पण न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. तसेच जी काही कायदेशीर लढाई लढाईची आहे ती लढणार असल्याचे देखील शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: