Kirit Somaiya: शपथविधी अजित पवारांचा पण चर्चा किरीट सोमय्यांची! आरोप केलेल्या नेत्यांचे काय होणार?
Kirit Somaiya: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारत अजित पवार हे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. तर, दुसरीकडे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची चर्चा सुरू झाली.
Kirit Somaiya : आज राज्याच्या राजकारणात अनपेक्षितपणे मोठे वळण आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये ईडीच्या (ED) रडारवर असलेल्या हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचाही समावेश आहे. त्यामुळे दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण, लोकांमध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याबद्दल चर्चा रंगली. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले आणखी काही आमदार आता भाजपसोबत आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भ्रष्टाचारी असल्याची टीका करत पवारांवर शरसंधान साधलं होतं. तर, दुसरीकडे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना भाजपकडून दोन्ही पक्षांचे अनेक नेत्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरुन लक्ष्य करण्यात आले होते. राज्यात 2014 मध्ये भाजपचे आणि त्यानंतरच्या सहा महिन्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर भाजपने आरोप केलेले काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. यामधील बहुतेक नेत्यांवर किरीट सोमय्या यांनीदेखील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करत गंभीर आरोप केले होते.
पुढे 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा सक्रीय झाले. त्यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य केले. सोमय्या यांनी अनेक कागदोपत्री पुरावे सादर केले. काही प्रकरणांचे पुरावे तपास यंत्रणांकडे सोपवले. त्या आधारे तपास यंत्रणांनी कारवाईदेखील सुरू केली होती.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगातही डांबले होते. सध्या राऊत जामिनावर बाहेर आहेत. तर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर सोमय्यांनी आरोपांचा धुरळा उडवला. त्याशिवाय, अनिल परब, माजी महापौर किशोरी पेडणेकर, काँग्रेस आमदार अस्लम शेख आदींविरोधातही सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार मोकळा श्वास घेणार?
अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात सोमय्या यांनी तपास यंत्रणांकडे तक्रार केली होती. ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांवर छापे मारले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
राष्ट्रवादीचे कागलमधील आमदार मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे. ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर अटकेवर टांगती तलवार आहे. त्याशिवाय, कोल्हापूर आणि मुंबईतही मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
सोमय्या यांनी आरोप केलेले आमदार छगन भुजबळ यांनादेखील ईडीने अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत. तर, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांच्यावर देखील आरोप केले होते. आता ही मंडळी आता भाजपसोबत सत्तेत आहेत.
शिंदे गटातील आमदार, खासदारांवर आरोप
शिवसेनेचे आमदार यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्यावर सोमय्यांनी गंभीर आरोप केले. शेल कंपनीद्वारे कोट्यवधींचा काळा व्यवहार जाधव यांनी केला असल्याचा आरोप केला. आयकर विभागाने तीन दिवस जाधव यांच्या घराची झडती घेतली. या छाप्यात जाधव यांच्याकडे बेनामी संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती. तर, आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधातही सोमय्या यांनी आघाडी उघडली होती. सरनाईक यांच्यावर एनएसईएल घोटाळा प्रकरणात ईडीने कारवाई केली होती. ईडीने सरनाईक यांची चौकशीदेखील केली होती. तर, खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी ईडी, सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीने भावना गवळी यांच्याशी संबंधित पाच संस्थांवर छापे मारले होते.
आधी आरोप मग भाजपात...
किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले बहुतांशी नेते हे भाजपात सामिल झाले आहेत. यामध्ये नारायण राणे, कृपाशंकर सिंह, विजयकुमार, बबनराव पाचपुते आदी नेत्यांवरही आरोप करत हे नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केला होता. मात्र, या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.