Ajit Pawar : राजकीय भूकंपाच्या चर्चेनंतर पुण्यात होणार अजित पवारांची पहिलीच प्रकट मुलाखत ; दादांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
Ajit Pawar: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे. सकाळ माध्यम समुहाकडून ही मुलाखत घेण्यात य़ेणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात ही मुलाखत होणार आहे.
Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) राजकीय भूकंप करतील आणि ते भाजपात जातील, अशा चर्चा रंगल्या होत्या. 40 आमदार त्यांच्यासोबत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. मी जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच अजित पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे. सकाळ माध्यम समुहाकडून ही मुलाखत घेण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात ही मुलाखत होणार आहे. या मुलाखतीत अजित पवार नेमकं काय बोलणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
अजित पवारांची जोरदार चर्चा
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे आणि त्याचा केंद्रबिंदू अजित पवार आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात भूकंप होईल आणि अजित पवार भाजपात जाईल अशा चर्चा रंगल्या. त्यानंतर पुण्यातील एका कार्यक्रमानंतर ते नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे या चर्चांना खतपाणी मिळालं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी गायब नसल्याचं सांगितलं होतं. पित्ताचा त्रास झाल्याने ताफा सोडून खासगी गाडीने आराम करण्यासाठी घरी गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी त्यांची मुंबईत भेट घेतली होती. याच दरम्यान 40 आमदार अजित पवारांच्या सोबत आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. मात्र त्यानंतरही त्यांना माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. मी कोणत्याही पक्षात जात नाही माझ्यासोबत कोणीही आमदार नाहीत. त्यामुळे गैरसमज पसरवू नये, असं त्यांनी सांगितलं होतं.
विभागीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात अनुपस्थित?
उद्या (21 एप्रिल) घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विभागीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर 2023 होणार आहे. या शिबिराला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर पार पडणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत 'ध्येय राष्ट्रवादीचे...मुंबई विकासाचे'...या शिर्षकाखाली हे शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात अजित पवार यांचं नाव नसल्यानं या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये नियोजित कार्यक्रम म्हणजेच प्रकट मुलाखत असल्याने ते मुंबईतील या शिबीरात उपस्थित राहणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.