Sanjay Raut : स्वार्थी लोक ओळखण्यात आमची चूक, त्यांच्या जाण्यानं शिवसेनेला धक्का नाही : संजय राऊत
शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) या शिवसेना ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरुय. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली.
Sanjay Raut : काही लोक स्वार्थासाठी पक्षात येतात आणि स्वार्थासाठी निघून जातात. त्यांच्या निघून जाण्यानं शिवसेनेला कोणताही धक्का बसला नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) या शिवसेना ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत बोलत होते. त्यांचा शिवसेनेशी तसा संबंध नव्हता असेही राऊत म्हणाले.
यापुढे काळजी घेतली जाईल
स्वार्थी लोकांना ओळखण्यात आमची चूक झाली आहे. गेल्या अनेक वर्षात ही चूक झाल्याचे मी वारंवार सांगितल्याचे राऊतांनी सांगितले. यापुढे काळजी घेतली जाईल असे राऊत म्हणाले. अशा लोकांना पक्षात प्रवेश दिला तरी त्यांना जबाबदारीची कोणतीही पदे देऊ नयेत असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत मी चर्चाही करत असतो असे राऊत म्हणाले. यापुढे प्रत्येक नाणं हे वाजवून घेतलं जाईल असे राऊत म्हणाले. कवडीची किंमत नसलेली काही लोकं असतात. ती आमच्याकडं येतात. मोराचा पिसारा त्यांना लावला जातो. मग तो पिसारा नाचवत ती लोकं तिकडं जातात असेही राऊत म्हणाले.
काही अतृप्त आत्मे स्वार्थासाठी जात असतील
काही अतृप्त आत्मे स्वार्थासाठी जात असतील असे वक्तव्य करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आमदार मनिषा कायंदे यांच्यावर टीका केली. विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असलेले, परत आमदारकी मिळणार नसल्याने प्रवेश करत असतील असे विनायक राऊत म्हणाले.
ते फिरते चषक, किशोरी पेडणेकर यांची मनिषा कायदेंवर टीका
ते फिरते चषक आहे. त्या भाजप सोडून आमच्या पक्षात आल्या. जे मिळवायचे ते मिळवले आता त्या सोडून जात असल्याचे म्हणत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनिषा कायंदेंवर टीका केली.
आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत शिबीर
आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबिर पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे .
कोण आहेत मनिषा कायंदे?
विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे करणार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे. भाजपकडून 2009 ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या . त्यानंतर 2012 साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. 2018 साली त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली होती .