Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे आज भूमिका स्पष्ट करणार; राज्यसभेची निवडणूक लढणार की माघार घेणार?
Sambhajiraje Chhatrapati : आज सकाळी 11 वाजता संभाजीराजे छत्रपती यांची मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद होणार आहे
Sambhajiraje Chhatrapati : राज्यसभेची निवडणूक संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati)लढणार की त्यातून माघार घेणार हे आज स्पष्ट होणार आहे. संभाजीराजे छत्रपती आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता संभाजीराजे छत्रपती यांची मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेला राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) समन्वयक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली, सहाव्या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराची वर्णी
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सध्या तरी पाच उमेदवार सहजपणे निवडून जाऊ शकतात. तर, सहाव्या जागेसाठी चुरस असणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी सहावी जागा ही आपल्याला द्यावी, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर चर्चेचा धुरळा उडाला होता, शिवसेनेने संभाजी राजेंनी पक्षात प्रवेश करावा त्यानंतर उमेदवारी जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली. त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार हे स्पष्ट झालं होतं. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती मिळत होती. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराची वर्णी लागली असून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
संभाजीराजे छत्रपती नेमकी काय भूमिका घेणार?
या सर्व घडामोडींनंतर संभाजीराजेंनी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करुन आपली भूमिका जाहीर करु असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून संभाजीराजे विविध लोकांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. आता संभाजीराजे छत्रपती नेमकी काय भूमिका घेणार, ते निवडणूक लढणार की माघार घेणार हे आज स्पष्ट होणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीराजेंना मनसेने पाठिंबा दिला आहे. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी यामध्ये राजकारण आणायचं नसल्याचं सांगितलं. आमदार राजू पाटील म्हणाले की, "संभाजीराजेंची चांगल्या भावनेने भेट घेतली असून त्यांना मतदान करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. इतके दिवस पक्षात या तर मत देवू, हे जे काही सुरू आहे ते चुकीचं आहे, सर्वांनी मतदान करून राजेंना पाठिंबा दिला पाहिजे."