(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Political Crisis : 'त्या' 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस, 48 तासांच्या आत मत मांडा, सोमवारपर्यंत वेळ
Maharashtra Political Crisis : 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत मांडण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
Maharashtra Political Crisis : बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत माडण्यासाठी सागण्यात आलं आहे. या आमदारांनी त्यांचं मत मांडलं नाही, तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. आजपासून सर्वांना नोटिसा जातील आणि त्यांना सोमवार पर्यंत वेळ देण्यात येईल, यावर त्यांना उत्तर द्यायचं आहे असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
बंडखोर आमदारांना दोन दिवसांचा वेळ
शिवसेनेने 16 आमदारांच्या अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर काल चर्चा झाली. या विषयावर सलग तब्बल चार तासांपासून चर्चा सुरु होती. अखेर रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास महाधिवक्ता देखील विधान भवनात दाखल झाले. त्यानंतर नरहरी झिरवळ आणि इतर नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीत अखेर बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची नोटीस काढण्याचा निर्णय घेण्यात आली. दरम्यान, बंडखोर आमदारांना नोटीसमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात येतील. त्यानंतर त्यांना अपात्र ठरविण्यात येईल, तसेच बंडखोर आमदारांना दोन दिवसांचा वेळ दिला जाईल. दोन दिवसात आमदार आपले उत्तर दाखल केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. शिवसेनेचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. या बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचं का नाही ते आता उद्धव ठाकरे ठरवतील असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं. या आमदारांचा एक वेगळा गट होऊ शकत नाही, त्यांना भाजपमध्ये विलिनीकरण करावं लागेल. मग ते कट्टर शिवसैनिक आहेत ही जी काही डॉयलॉगबाजी ते करत होते ती बंद होईल असंही अरविंद सावंत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी 'त्या' आमदारांसाठी स्वत:चे दरवाजे बंद केले - खासदार सावंत
"शिवसेना सोडून काही लोक दूर जाऊन लपलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यागी भावनेने वर्षा निवासस्थान सोडून दिले. मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारांसाठी स्वत:चे दरवाजे बंद केले आहेत. त्यांना शिवसेनेच भगवा सोडून कमळाबाईचा साथ पकडावी लागेल. आता त्यांना गट निर्माण करता येणार नाही तर दुसऱ्या पक्षात जावं लागेल. आम्ही सर्व उत्तर दिले आहे. यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. येत्या 4 दिवसांत कारवाई होईल", अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.