(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Mitkari On BJP : 'भाजपचे हिंदुत्व बेगडी'; भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराची दुसऱ्याच दिवशी टीका
Maharashtra Political News : भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराकडून दुसऱ्याच दिवशी टीका झाल्याने चर्चेला उधाण आले आहेत.
Maharashtra Political News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) रविवारी भाजपसोबत जात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तर अजित पवारांसह एकूण 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. विशेष म्हणजे, अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 30 पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र काल भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांपैकी एक असलेले अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आज थेट भाजपचे हिंदुत्व काढत जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व बेगडी असून, मी आजही ते सांगतो असे मिटकरी म्हणाले. त्यामुळे भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराकडून दुसऱ्याच दिवशी टीका झाल्याने चर्चेला उधाण आले आहेत.
कालपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाले की, 'भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व आणि दुसऱ्या पक्षाचे हिंदुत्व नाही का? मी आरएसएस आणि संघाचा टोकाचा विरोधक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील संघाच्या विरोधात होते. पण काँग्रेससोबत देखील त्यांची युती झाली नव्हती. शामाप्रसाद मुखर्जी होते त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते. पण त्यांनी आरएसएसच्या विरोधातील आपलं युद्ध काही थांबवले नव्हते. आम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार महाराष्ट्राला सांगणारे लोकं आहोत. आम्ही आमच्या तत्वाशी तडजोड करत नाही. त्यामुळे भाजप हिंदुत्व सांगत असेल तर भाजपचे हिंदुत्व बेगडी असल्याचं मी आजही ते सांगतो असे मिटकरी म्हणाले.
भाजप चुकल्यास विरोधात भूमिका घेणारच...
दरम्यान, पुढे बोलताना मिटकरी म्हणाले की, जिथे चुकीचं घडेल त्याठिकाणी आम्ही भूमिका घेणारच. अजित पवारांची जी प्रशासनावर पकड आहेत, त्याची आज महाराष्ट्राला गरज होती आणि तो निर्णय आज झाला आहे. तर आमच्या पक्षात इतर पक्षासारखी फुट पडलेली नाही. आमचा पक्ष फुटीर नाही. तर शरद पवार साहेबच आमचे आदर्श आहेत. राहिला प्रश्न किती आमदारांचं पाठींबा आहे. तर अजीत दादा आणि शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी पक्ष आहे, असेही मिटकरी म्हणाले आहे.
कोणासोबत किती आमदार?
अजित पवारांनी रविवारी 9 राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत मंत्रीपदाची शपथ घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यावेळी अजित पवारांसोबत 40 आमदार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तर सर्वच राष्ट्रवादी अजित पवारांसोबत असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. तर अजित पवार किंवा शरद पवारांनी देखील अजून किती आमदार आपल्यासोबत आहेत याबाबत खुलासा केला नाही. त्यामुळे सध्या कोणासोबत किती आमदार आहेत, याबाबत कोणतेही स्पष्टता होऊ शकली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या :
Marathwada NCP MLA: मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे कोणते आमदार अजित पवारांसोबत जाणार?